आयसीएमआरकडून परवानगी : मंत्री के. सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने मागील आठवडय़ात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अवलंब करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेकडे (आयसीएमआर) केली होती. याला मान्यता मिळाली असून शनिवारी कोरानाबाधित रुग्णावर राज्यातील पहिली प्लाझ्मा थेरपी केली जाणार आहे. या थेरपीसाठी संसर्गमुक्त व्यक्तीने रक्त देण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे.
बेंगळूरच्या एचसीजी बेंगलोर इन्स्टिटय़ूट ऑफ ऑन्कोलॉजी स्पेशालिटी सेंटरला प्लाझ्मा थेरपीसाठी आयसीएमआरने सोमवारी संमती दर्शविली होती. या उपचार पद्धतीत कोरानाबाधित रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानंतर त्याच्या रक्ताचा वापर दुसऱया पॉझिटिव्ह रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे शनिवारी कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा अवलंब केला जात आहे, असे ते म्हणाले.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना घाबरण्याचे कारण नाही. कोरोना देखील इतर विषाणूंप्रमाणेच आहे. त्यामुळे 97 टक्के रुग्णांना सामान्य तापाप्रमाणे हा ताप येतो. राज्यात मागील दीड महिन्यात केवळ 474 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 150 हून अधिक जण संसर्गमुक्त झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.









