शिवपुतळय़ाची विटंबना करणाऱयांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी येथील सदाशिवनगर पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवरायांच्या पुतळय़ावर शाई ओतणाऱया समाजकंटकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे, तर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील सँकी रोडवर भाष्यम सर्कलमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. गुरुवारी रात्री अज्ञातांनी या पुतळय़ावर शाई ओतून विटंबना केली. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रातून संताप व्यक्त करून निषेध नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, बेंगळूरमधील शिवपुतळा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुतळय़ाची विटंबना करणाऱया अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती बेंगळूर सेंट्रल विभागाचे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी दिली आहे. दोन गटांच्या भावना भडकविणे आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान करणाऱया समाजकंटकांच्या अटकेसाठी व्यापक शोध सुरू आहे. शाई ओतून पुतळय़ाची विटंबना करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली आहे. दरम्यान, बेंगळूरमध्ये सँकी रोड परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.
बेंगळूरमध्ये मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात
बेंगळूरमधील मराठा समाजाने शिवपुतळय़ाच्या विटंबनेच्या निषेधार्थ रविवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱयांनी मराठा संघटनेच्या नेत्यांना शनिवारी सदाशिवनगर पोलीस स्थानकात बोलावून शांतता बैठक घेतली. शिवपुतळय़ाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगितले आहे. शांतता बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मराठा संघटनेच्या पदाधिकाऱयांनी, कर्नाटकात मराठा आणि कन्नड भाषिक एकत्र नांदत आहेत. काही समाजकंटकांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा हे देशासाठी लढलेले महान व्यक्ती आहेत. त्यामुळे चुका केलेल्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली.
राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली
बेंगळूर आणि बेळगावमधील घटनेसंबंधी डी. के. शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. कायदा हातात घेणे योग्य नव्हे. नैतिक पोलिसगिरीला पाठिंबा न देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली होती. मात्र, त्यांनी अशा कृत्याला प्रोत्साहन दिले आहे. आता त्यांना पश्चाताप होत आहे, अशी टीका डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. देशासाठी लढा दिलेल्या थोर व्यक्तींच्या पुतळय़ाचा कोणत्याही जाती किंवा धर्मियांनी अवमान करू नये. असे कृत्य केलेल्यांना कोणत्याही कारणास्तव माफ करू नये, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
प्रतिक्रिया नको; कारवाई करा!
मुख्यमंत्र्यांनी केवळ प्रतिक्रिया देऊ नये. समाजकंटकांवर कारवाई करावी. कोणीही आवेशाच्या भरात दुष्कृत्य न करता संयमाने वागावे. समाजिक शांततेला धक्का पोहोचणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दिली आहे.
कोट्स….
कठोर कारवाईची पोलिसांना सूचना
बेळगावमध्ये समाजविरोधी कृत्य करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. काही जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. संगोळ्ळी रायण्णांच्या पुतळय़ाची हानी करणे निषेधार्ह आहे. शिवाजी महाराज आणि संगोळ्ळी रायण्णा या गर्वाने स्मरण करण्यासारख्या महान व्यक्ती आहेत. त्यांच्या नावे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱयांवर कारवाई करण्यात येईल.
– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री
कायदा हातात घेणाऱयांवर कारवाई
सरकारी मालमत्तेचे नुकसान झालेल्या घटनेचा आपण निषेध नोंदवत आहे. कायदा हातात घेणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची सूचना गृहमंत्र्यांना दिली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता उपाययोजना करण्यात येतील. राष्ट्रीय नेते, देशभक्तांच्या पुतळय़ांची विटंबना करणे योग्य नाही. अशा घटना करणारे देशभक्त नव्हेत. देशभक्तांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
– बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री









