एनसीबी पथकाची कारवाई : लातूरमधील तिघांना अटक : महाराष्ट्रासह विविध राज्यात होत होता पुरवठा
प्रतिनिधी /बेंगळूर
हैदराबादमधून महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ट्रकमधून पुरविण्यात येणारा 21 कोटी रुपयांच्या 3,400 किलो गांजासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिंदे, कांबळे आणि जोगदंद अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून हे सर्वजण महाराष्ट्रातील लातूर येथील आहेत. बेंगळूर विभागाच्या अमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) पथकाच्या अधिकाऱयांनी रविवारी ही कारवाई केली.
हैदराबाद-बेंगळूर मार्गावरून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱयांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत ट्रकमधील 3,400 किलो गांजा जप्त केला. तसेच तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
गेल्या जून महिन्यात कारवाई केलेल्या एनसीबी अधिकाऱयांनी 15 कोटी रुपये किमतीचा 2 हजार किलो गांजा जप्त केला होता. दरम्यान, महाराष्ट्रातील चौघांना अटक केली होती. पण आता 21 कोटी रुपयांचा 3,400 किलो गांजा जप्त करीत एनसीबीने इतिहासात सर्वात मोठी कारवाई केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली.
तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात गांजाची विक्री वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या एनसीबी अधिकाऱयांनी यापूर्वी अमली पदार्थ प्रकरणी अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात जात असलेल्या ट्रकची तपासणी केली असता सदर ट्रकमध्ये गांजा वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. कोणालाही संशय येऊ नये यासाठी कोटय़वधी रुपयांचा गांजा झाडाच्या मातीसोबत प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवला होता. तसेच ताब्यात घेतलेला ट्रक महाराष्ट्र नोंदणीकृत आहे. संशयित आरोपींनी पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी गांजा पुरविणार होते, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
आरोपींनी महाराष्ट्रासह ओडिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थानसह श्रीलंकेला गांजा पुरवित होते. विविध राज्यांमध्ये होत असलेल्या पाटर्य़ा आणि कॉलेज विद्यार्थ्यांना लक्ष करून गांजाची विक्री करत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. अलीकडे आंध्रपदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यात बेकायदेशीरपणे गांजा पिकवून त्याचे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसह देशातील विविध राज्यात अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याचे दिसून आले आहे.
ऑगस्टपर्यंत 7,500 किलो गांजा जप्त
2020 मध्ये एनसीबी पथकाने 1,971 किलो गांजा जप्त करीत 8 जणांना ताब्यात घेतले होते. पण ऑगस्ट 2021 पर्यंत 7,500 किलो गांजा जप्त करून 25 जणांना अटक करण्यात एनसीबी पथक यशस्वी झाले आहे, असे एनसीबी बेंगळूर विभाग संचालक अमित गवाटे यांनी कळविले आहे.









