शहर पोलीस आयुक्त कमल पंथ यांचा आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळुरात कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात बुधवारपासून 20 एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात गटागटाने वावरण्यास निर्बंध असणार आहे. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंथ यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
बेंगळुरात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. यावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने शहर पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार शहरात गटागटाने वावरणे, संघटनांच्या आंदोलनावर निर्बंध घालण्यात आले आहे. एखाद्यावेळेस या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
धार्मिक स्थळांवर सामूहिक प्रार्थना करणे, कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात लोक जमा होणे आणि पब, बार, क्लब, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के नागरिकांना प्रवेश देण्याची अट घालण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. शहरातील दुकानदारांनाही सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. एखाद्यावेळेस दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.









