राजीव गांधी इस्पितळात दाखल : विमातळांवर प्रवाशांची तपासणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
चीनमध्ये धुमाकुळ घातलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने खबरदारी उपाययोजना हाती घेतली आहे. मागील तीन दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात आली असतानाच शनिवारी राज्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. बेंगळूरमधील राजीव गांधी इस्पितळात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जीवघेण्या कोराना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुणे येथील लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आले आहेत. रविवारी या रुग्णासंबंधीचा अहवाल राजीव गांधी इस्पितळाच्या डॉक्टरांच्या हाती येणार आहे. मुळची कर्नाटकातील असलेली व्यक्ती बेंगळूर विमानतळावर येऊन उतरल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी केली असता कोरोनासदृष लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्याला राजीव गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले.
दरम्यान चीनला जाऊन आलेले तिघे भारतीय आणि चार चीनी नागरिकांवर आरोग्य अधिकाऱयांनी करडी नजर ठेवली आहे. या सातपैकी एक व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण अधिक आढळून आली आहेत. विदेशातून बेंगळूर विमानतळावर येणाऱया प्रवासांची आरोग्य तपासणी केली जात आहेत.









