प्रतिनिधी/ बेंगळूर
सिरा आणि राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यामुळे या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि निजद या तिन्ही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून जोरदार रणनीती आखण्यात येत आहे. याबरोबरच पक्षांतर पर्वही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी बेंगळुरातील निजद व भाजप नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर आता स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजप प्रवेश केला आहे.
बेंगळूरच्या जालहळ्ळी प्रभागातील काँग्रेस सदस्य जानी, यशवंतपूर प्रभागातील जी. के. व्यंकेश, एच. एम. टी. प्रभागाच्या आशा सुरेश, लक्ष्मीदेवीनगरचे काँग्रेस पालिका सदस्य वेलू नायकर, कोट्टीगेपाळय़ाचे मोहनकुमार यांनी रविवारी भाजपचा झेंडा हाती घेतला. येथील मल्लेश्वरमच्या खासगी हॉटेलमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात भाजप राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी सी. टी. रवि, महसूलमंत्री आर. अशोक, राज्य उपाध्यक्ष अरविंद लिंबावळी यांच्या उपस्थित काँग्रेस नेत्यांनी भाजप प्रवेश केला. या सर्व काँग्रेस नेत्यांच्या भाजपप्रवेशामुळे राजराजेश्वरीनगरचे भाजप उमेदवार मुनिरत्न यांना आणखी बळ मिळाले आहे.









