प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येपैकी निम्मे रुग्ण बेंगळुरातच मिळून येत आहेत. बेंगळूरमध्ये कोरोनावर नियंत्रण आणल्यास राज्यातील कोरोना शक्यतो कमी होईल. 1 मार्च रोजी 210 नवे रुग्ण आढळून आलेल्या शहरात रविवारी तब्बल 1,039 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानुसार 4 ते 5 पटीने कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात बेंगळुरातील रुग्णसंख्या 4 हजारांवर येऊन पोहोचेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
लवकरच सरकारने तातडीने खबरदारीचा निर्णय न घेतल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती डॉक्टरांना वाटत आहे. फेब्रुवारी महिन्यात बेंगळुरात एकूण 6,813 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. तर मार्च महिन्यात यापूर्वीच 10 हजार रुग्णांची संख्या ओलांडली आहे. कोरोना नियंत्रणात बेंगळूर महानगरपालिकेनेही दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
राज्यात नवे 1,715 रुग्ण
राज्यात रविवारी 1,715 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1,048 जण कोरोनामुक्त झाले. त्यानुसार एकूण बाधितांची संख्या 9,70,202 इतकी झाली असून 9,44,256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 13,493 बाधितांवर उपचार केले जात आहेत. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे.









