क्वारंटाईन-कंटेन्मेंट झोनसाठीचा खर्च
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूंचा फैलाव सुरू झाल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले. प्रसार रोखण्यासाठी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येत होते. परिसरात बॅरिकेड्सह कंटेन्मेंट झोन करण्यात येत होते. त्यामुळे हॉटेल आणि बॅरिकेड्सच्या बिलाची रक्कम दीड कोटीच्या घरात गेली असून, निधीअभावी अदा करण्यात आली नाही.
कोरोना विषाणूंचा फैलाव सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने विविध उपाययोजना राबविण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालविले होते. महापालिका व्याप्तीमध्ये कोरोनाची लागण होऊ नये याकरिता शहरात सर्वत्र सॅनिटायझर फवारणी करणे तसेच परराज्यांतून येणाऱया नागरिकांना रोखून क्वारंटाईन करणे अशी खबरदारी घेण्यात आली होती. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांना हॉस्टेल व विविध हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. त्याचप्रमाणे कुटुंबीयांची कोरोना तपासणी करण्यात येत होती. या 14 दिवसांच्या कालावधीत क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात येत होती. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर हॉटेलमध्ये सॅनिटायझर फवारणी करून स्वच्छ करण्यात येत होते. अडीच महिन्यांच्या कालावधीत विविध हॉटेल व लॉजचा वापर करण्यात आला होता. याचे बिल एक कोटीच्या घरात गेले आहे. हॉटेल व लॉज चालकांनी बिल मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयात धावपळ चालविली आहे.
शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता काटेकोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत होती. याकरिता शहराच्या प्रत्येक गल्लीत प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स घालून रस्ते बंद ठेवण्यात आले होते. याकरिता पोलीस प्रशासनाकडील बॅरिकेड्स कमी पडल्याने भाडेतत्त्वावरील बॅरिकेड्स घेण्यात आले होते. रुग्ण सापडलेल्या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून प्रवेशबंदी करण्यासाठी बॅरिकेड्सचा वापर करण्यात येत होता. सलग अडीच महिने शहरात बॅरिकेड्सचा विळखा होता. या कालावधीत भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या बॅरिकेड्सचे बिल 60 लाखांच्या घरात पोहोचले आहे. या बिलाची रक्कम अद्याप अदा करण्यात आली नाही. बॅरिकेड्स लावलेल्या कंत्राटदाराने महापालिकेकडील बिल जमा केले आहे.
महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही
लॉकडाऊन काळात विविध ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परराज्यांतील नागरिकांना ठेवण्यात आलेल्या हॉस्टेलमध्ये तिन्ही वेळ नाष्टा-जेवण, झोपडपट्टी परिसर, त्याचप्रमाणे परप्रांतीय कामगारांना जेवणाची सुविधा महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. विविध भागात सॅनिटायझर करण्यासाठी औषध खरेदी व वाहनांचे साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे ही रक्कमदेखील कोटीच्या घरात गेली आहे. त्यामुळे अडीच महिन्यांच्या कालावधीत विविध कारणांसाठी अडीच कोटीहून अधिक निधी खर्च झाला आहे. यापैकी हॉटेल व बॅरिकेड्सचे बिल महापालिकेने अद्यापही अदा केले नाही. त्यामुळे सदर रक्कम अदा करण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे बिले अदा करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत महापालिका प्रशासन आहे.









