नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या देशाला बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात पहिले वहिले आंतरराष्ट्रीय यश मिळवून देत या खेळाला लोकप्रिय करणारे महान खेळाडू नंदू नाटेकर यांनी वयाच्या 88 व्या वषी जगाचा निरोप घेतला आहे. भारताला जागतिक पातळीवरील यशाची चव चाखायला देऊन नव्या पिढीला क्रीडा क्षेत्राकडे येण्यास उद्युक्त करणारे नाटेकर सर यांच्या निधनाने क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आज आपले बॅडमिंटनपटू जेव्हा आंतरराष्ट्रीय यश मिळवत आहेत, ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्यासाठी प्रयत्नांची पराका÷ा करत आहेत तेव्हा त्यांच्या या यशामागे एका महान खेळाडूचे संपूर्ण आयुष्य या क्रीडा प्रकारची पूर्वपीठिका बनून उभे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नंदू नाटेकर यांनी अंतिम श्वास घेतला त्या दिवशी पी. व्ही. सिंधूने मिळवलेले आंतरराष्ट्रीय यश ही खऱया अर्थाने नाटेकर यांच्यासारख्या महान आणि लोकप्रिय भारतीय खेळाडूला श्रद्धांजली ठरावी. 1956 मध्ये त्यांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय यश प्राप्त केले तेव्हापासून प्रदीर्घकाळ त्यांच्याकडे बघूनच खेळाडू तयार होत होते. 1951 मध्ये ज्युनिअर हार्ड कोर्ट भारतीय सामन्यांमध्ये रामनाथन कृष्णनबरोबर उपविजेता, सहा वेळा राष्ट्रीय एकेरी विजेतेपद, चार वेळा उपविजेतेपद, सहा वेळा राष्ट्रीय पुरुष दुहेरी विजेतेपद, तीन वेळा उपविजेतेपद एकूण 53 एकेरी विजेतेपदे, 43 पुरुष दुहेरी विजेतेपदे, 38 मिश्र दुहेरी विजेतेपदे अशा यशाने लोक या खेळ प्रकाराकडे आकृष्ट झाले नसते तरच नवल. त्याकाळात क्रिकेटपटूपेक्षा बॅडमिंटन यशस्वी आणि लोकप्रिय होते असे म्हटले तर कोणीही मान्य करणार नाहीत. मात्र ‘फ्री प्रेस बुलेटिन’ या वर्तमानपत्राच्या सर्वाधिक प्रसिद्ध खेळाडू निवड चाचणीमधे प्रथम क्रमांक पटकावत नंदू नाटेकर यांनी त्याकाळातील लोकप्रिय विनू मंकड व लॅव्हि पिंटो यांना मागे टाकले होते! 1956 मध्ये मलेशियामध्ये पुरुष एकेरी विजेता, 57 साली पुरुष एकेरी विजेता, 63 मध्ये थायलंडमध्ये किंग्ज कप पुरुष एकेरी विजेता, थॉमस कप सामन्यांमध्ये एकूण 16 एकेरी सामन्यांमधे 12 वेळा विजेता आणि दुहेरीत 16 सामन्यांपैकी 8 वेळा विजेता, जमैकामधे राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये भारतातर्फे सहभाग या यशाप्रमाणेच 1954-55 च्या थॉमस कप दरम्यान प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेमधे त्यांचा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’मधे उल्लेख झाला होता. ऑल इंग्लंड बॅडमिंटन सामन्यांमधे 1954 साली क्वॉर्टर फायनल, वर्ल्ड इन्व्हिटेशन सामन्यामध्ये सेमी फायनल तर ऑल अमेरिकन सामन्यामधे सेमी फायनलपर्यंत मजल मारणाऱया नाटेकर यांनी 1985 मध्येही कारकीर्द गाजवली. तसे तर 1961 साली ‘अर्जुन’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला असतानाही ते खेळापासून दूर गेले नाहीत. बॅडमिंटनमध्ये सुरू असणाऱया प्रत्येक घडामोडींशी ते प्रदीर्घ काळ स्वतःला जोडून घेत आणि अद्ययावत राहिले. कॅनडामधे प्रौढ जागतिक उत्कृष्ट खेळाडूंमध्ये रौप्य पदक (1985) डेन्मार्कमधे प्रौढ जागतिक उत्कृष्ट खेळाडूंमध्ये रौप्य पदक पटकावून त्यांनी स्वतःचे उमदेपण सिद्ध केले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेल्या नंदू नाटेकर यांचा जन्म सांगलीचा आणि जिथे बॅडमिंटन या खेळाची प्रगती झाली त्या भूमीत- पुणे येथे त्यांचे वास्तव्य होते. शालेय वयात सांगलीत सांगली हायस्कूलचे क्रिकेटपटू म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली होती. 1948-49 मध्ये शालेय वयात त्यांनी सांगली हायस्कूलच्या क्रिकेट टीम मधून सहभाग नोंदवला. त्या दरम्यानची सलग तीन वर्षे ज्युनिअर टेनिस स्पर्धा गाजवून त्यांनी आपले क्षेत्र निवडले आणि त्यात प्रगती केली. क्रिकेट आणि टेनिस या अन्य दोन क्रीडा प्रकारात सुद्धा ते चमकले होते. आपल्या करिअरमध्ये शंभरपेक्षा अधिक टायटल जिंकणारे नंदू नाटेकर यांच्याविषयी भारताच्या पंतप्रधानांसह अनेकांनी गौरवोद्गार काढून त्यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे. पी. गोपीचंद यांनी त्यांना भारतीय बॅडमिंटनचे लिजेंड म्हणून गौरवले. त्यांच्या गोष्टी ऐकूनच आपण मोठे झालो. केवळ बॅडमिंटन नव्हे तर क्रिकेट आणि टेनिसमध्येही ते यशस्वी खेळाडू होते. सुरेश गोयल, दिनेश खन्ना, प्रकाश पदुकोण आणि नंदू नाटेकर यांनी भारतीय खेळाची उंची वाढवली. भारताचे आणखी एक माजी प्रशिक्षक विमल यांना त्यांच्या वडिलांनी या क्षेत्रात आणले तेच मुळात नाटेकर यांच्या खेळावर बेहद्द खूष असल्यामुळे! त्रिवेंद्रम येथे राष्ट्रीय स्पर्धेला त्यांना पाहूनच त्यांनी आपल्या मुलासाठी घराबाहेर कोर्ट बनवले आणि ते या खेळाशी जोडले गेले! नाटेकर यांच्या शानदार खेळाची साक्ष जपणारे त्यांचे सह खेळाडू अब्दुल शेख आजही साठच्या दशकातील त्यांची खेळी, शानदार शॉट, फूट वर्कची आठवण काढतात. काळ बदलला, ओळख पुसण्याइतका वेळ गेला तरी नंदू नाटेकर यांना देश विसरलेला नाही. भारतीय खेळ संस्थांच्या प्रगतीचा जेव्हा जेव्हा विचार होईल तेव्हा त्यांचे नाव घेतले जाईल, त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल यात शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच भावना बोलून दाखविल्या आहेत. भारताच्या क्रीडा इतिहासात नंदू नाटेकर यांचे एक विशेष स्थान आहे. ते एक उत्तम खेळाडू आणि महान गुरु होते. त्यांची कारकिर्द नव्या खेळाडूंना नेहमीच प्रेरणा देत राहील असे त्यांनी म्हटले ते सत्यच आहे. सायना नेहवाल, श्रीकांत किदांबी, पी. व्ही. सिंधू यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या दहात तीन स्थाने पटकावली आहेत. प्रकाश पदुकोण प्रथम स्थान निर्माण करणारे पहिले भारतीय खेळाडू बनले होते. त्यानंतर श्रीकांतने 2018 मध्ये हे स्थान पटकावले. सायना 2015 मध्ये हे स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला बनली तर सिंधूने ऑलिंपिकमध्ये पदक पटकावले. आज अनेकांना आपल्या मुलांनी असे खेळाडू बनावे असे वाटते. कधी काळी डॉक्टर, इंजिनियर लोकांचा खेळ मानला जाणारा हा क्रीडाप्रकार आता सामान्य वर्गात लोकप्रिय होतो आहे, झाला आहे. पण त्याची सुरुवात तीही दणक्मयात झाली होती ती नाटेकर यांच्यापासून. तिथून सुरू झालेला हा प्रवाह विस्तरत आहे ही त्या महान खेळाडूच्या आयुष्याची फलश्रुती! तरुण भारत परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्ण 8 हजारांखाली; 14 मृत्यू
Next Article गुगल-ऍपलसह मायक्रोसॉफ्टला विक्रमी नफा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.







