उर्फान मुल्लाकडून गुंडूरावांवर आरोप
अमरनाथ पणजीकरांनी घेतला मुल्लाचा समाचार
प्रतिनिधी/ पणजी
बॅगा संस्कृतीवरून सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार वाप्युद्ध सुरू झाले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातून भाजप प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी काँग्रेसमध्ये पूर्वापार बॅगा संस्कृती असल्याचा गंभीर आरोप केला आहे तर काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर शरसंधान करताना भाजपही बॅगा संस्कृतीसाठी प्रसिद्ध असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी बॅगा घेतल्या जातात तर भाजपकडून आमदार खरेदीसाठी भरभरून बॅगा खर्च होतात, असे दावे दोन्ही प्रवक्त्यांनी केले आहेत. गोवा भेटीवर आलेले काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांना टार्गेट करताना, बॅगा जमविणे ही काँग्रेसी परंपराच असून निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवार आणि युतीसाठी इच्छूक अन्य पक्ष यांच्याकडून बॅगा भरून नेण्यासाठीच गुंडूराव आले आहेत, असे मुल्ला यांनी म्हटले आहे. यापूर्वी तामीळनाडू तसेच पाँडिचेरीमध्येही त्यांनी तीच परंपरा चालविली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
गुंडूरावांच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा नाही- मुल्ला
त्यामुळेच गुंडूराव यांच्या बोलण्यात कोणताच स्पष्टवक्तेपणा दिसत नाही. ज्या कामासाठी आपण आलो आहोत ते सोडून अन्य सर्व विषयांवर ते बोलतात. भाजपवर टीका आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आरोप करण्यातच वेळ घालवत आहेत. त्यातून आपण कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे, पक्षबांधणीसाठी आलो आहे, याचाही त्यांना विसर पडला आहे, अशी जोरदार टीका मुल्ला यांनी केली आहे.
सावंत सरकारने ज्या भ्रष्ट मंत्र्यांना सरकारमधून बाहेर फेकले अशा लोकांना काँग्रेस कळपात आणण्यासाठी गुंडूराव फिरत आहेत. प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यापूर्वी काँग्रेस कधीच गोवा फॉरवर्डशी युती करणार नाही, असा संकल्प केला होता. आर्श्चकारक प्रकार म्हणजे आता तेच लोक त्याच पक्षाशी युती करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. अशा वेळी त्या संकल्पाचे काय झाले? याचे उत्तर चोडणकर यांनी द्यावे, तसेच काँग्रेसने आधी युतीसंदर्भात धोरणही स्पष्ट करावे, अशी मागणी मुल्ला यांनी केली.
बॅग संस्कृतीत भाजपच जास्त प्रसिद्ध- पणजीकर
दरम्यान, वरील आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते पणजीकर यांनी बॅग संस्कृतीसाठी भाजपही तेवढाच प्रसिद्ध असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे 10 आमदार खरेदी करण्यासाठी भाजपने बॅगा भरून पैसा खर्च केला व गैरमार्गाने अनैतिक सरकार घडविले याची कल्पना प्रत्येक गोमंतकीयास आहे. सध्या काँग्रेसवर आरोप करणारा विद्यमान प्रवक्तासुद्धा काँग्रेसमधूनच आयात केला आहे याचे स्मरण भाजपने ठेवावे. अशा या भाडोत्री प्रवक्त्याने केलेल्या असभ्य आरोपांबद्दल आपण त्यांचा निषेध करत असल्याचे पणजीकर म्हणाले.
गोव्यात काँग्रेसने काय करावे, कुणाशी युती करणार, केव्हा करणार? हे विचारण्याचा अधिकार मुल्ला यांना नाही. मुल्ला यांना युतीबद्दल विचारायचेच असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सूचविल्यानुसार अध्यक्ष सदानंद तानावडे यांना विचारावे, असा सल्ला पणजीकर यांनी दिला.
मुल्ला यांनी सतीश धोंड यांना विचारावे
मुल्ला यांना विचारायचेच असेल तर त्यांनी काँग्रेसचे 10 आमदार खरेदी करण्यासाठी ज्या प्रकारे भाजपने बॅग संस्कृती आचरणात आणली, त्या फुटीर आमदारांना पुन्हा उमेदवारी देणार की नाही याबद्दल संघटनमंत्री सतीश धोंड यांना विचारावे, असा सल्लाही पणजीकर यांनी दिला.
मुल्ला हे भाडोत्री बबलू
भाजपची वैचारिक पातळी एवढी खालावली आहे की, सध्या त्यांच्याकडे निष्ठावान, सक्षम, सामर्थ्यशील, विश्वासार्हता, आदर असलेला प्रवक्ता नाही. त्यामुळेच मुल्लासारख्या आयात केलेल्या ’भाडोत्री बबलूंचा’ आधार त्यांना घ्यावा लागतो. मुल्ला केवळ बडबड करतो. त्याचा मेंदू रिकामा आहे, म्हणूनच कोणताही विचार न करता काँग्रेस नेत्यावर आरोप करत आहे, असे पणजीकर म्हणाले.
काँग्रेसचे प्रभारी जर बॅगा नेण्यासाठी आले होते असा आरोप मुल्ला करत असेल तर नुकतेच गोव्यात येऊन गेलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हेही बॅगा नेण्यासाठीच आले होते, असा आरोप आम्हीही करू शकतो, तो भाजपला मान्य असेल का? असा सवाल पणजीकर यांनी केला. तसे नसेल तर मुल्ला यांनी गुंडूराव यांची माफी मागावी, तसेच स्वतःचे तोंड बंद ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.









