बेळगाव :/ प्रतिनिधी
कोरोनामुळे केंद्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. त्यासाठी जनधन योजनेंतर्गत बॅंक खाते असणे आवश्यक आहे. असे समजून अनेक जण जनधन बँक खाते काढण्यासाठी धडपडू लागले आहेत. बँकांमध्ये गर्दी होत असल्याने ऑनलाईन माध्यमातून बँक खाते काढण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर गर्दी होत आहे. हीच संधी साधत काही ऑनलाईन सेंटर चालक अधिक रक्कम उखळत आहेत. अशा तक्रारी वाढल्या असून अशा ऑनलाईन सेंटर चालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
जनधन बँक खाते पूर्णपणे विना शुल्क आहे. कोणत्याही बँकेमध्ये ते सहज काढले जाते. काही बँकांमध्ये त्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक जण ऑनलाईन सेंटरवर जात आहेत. मात्र चालकांकडून त्यांची लुट होत आहे. झेरॉक्स प्रतसाठीही अधिक रक्कम उखळली जात आहे. तेव्हा अशा ऑनलाईन सेंटरवर कारवाई होणे गरजेचे आहे.
कोरोनामुळे केंद्र व राज्य सरकाराने काही घटकांना पॅकेज जाहीर करत आहे. त्या घटकातील सर्व सामान्य जनतेला जनधन योजनेंतर्गत बँक खाते आवश्यक आहे. असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनधन योजनेंतर्गत बँक खाते काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. हीच संधी साधत सर्वसामान्य जनतेची लुट केली जात आहे. असा आरोप होत आहे.
बँकांमध्ये जनधन खाते उघडा
सर्व बँकांमध्ये जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडता येते. प्रत्येक बॅकेमध्ये एक प्रतिनिधी असतो. तो सर्व माहिती ग्राहकाला देत असतो. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो घेऊन गेल्यानंतर जनधन योजनेंतर्गत बँक खाते काढता येते तेव्हा कोणीही इतर ठिकाणी पैसे देऊन बँक खाते काढू नये असे आवाहन लिड बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.









