खासदार शरद पवार यांचे शिष्ट मंडळाला आश्वासन
प्रतिनिधी/ सातारा
गेली आठ महिने कोरोना या जागतिक महामारीने अडचणीत असलेल्या असंघटीत वर्गातील बँड-बेन्झो कलाकार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या अडचणींबाबत संघटनेचे मार्गदर्शक जेष्ठ दलित नेते भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्ट मंडळाने खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी (माधवबाग, पुणे) येथे भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी शिष्ट मंडळसोबत आलेल्या कलाकरांचे प्रश्न समजावून घेवून पदाधिकाऱयांच्या बरोबर सखोल चर्चा केली. त्यांच्या या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेऊन तसे परिपत्रक मा. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून काढता येईल असे आश्वासन पवार यांनी शिष्ट मंडळाला दिले.
अनलॉकमुळे समाजातील संस्था व मंदिरे सोडली तर बाकी सर्व प्रकारचे व्यवहार सुरू झालेले दिसतात. या कलाकार मंडळीचे वाद्य वाजविणे यावरच बंधन का ? ते तातडीने सुरू झाले तर हा कलाकार वर्ग स्वत:ला व पुटुंबाला सावरू शकेल. तेव्हा वादन प्रकार किमान 15 कलाकारांच्या संचासह (गाडी) सुरू होणेसाठी आपणाकडून प्रशासकीय वर्गाला आदेश व्हावेत. त्याचबरोबर ज्यांच्या वाजविण्याशिवाय समाजातील कोणतेही शुभकार्य किंवा कोणतेही सांस्कृतिक उपक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना लोककलेची मान्यता नाही. तेव्हा बँन्ड-बेन्जो सादरीकरणाला लोककलेची मान्यता मिळाली पाहिजे आणि लोप पावत चाललेल्या पारंपारिक कलेच्या वृद्धीसाठी प्रत्येक जिह्यात संगीत महाविद्यालय सूरू करण्यात यावे. थकित वृद्धकलाकार मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा व्हावी. अशा विविध मागण्यावर पवार यांच्याशी पदाधिकाऱयांनी चर्चा केली. त्यावर शरद पवार यांनी संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून तात्काळ व्यवसाय सुरू करणेसाठी नियमावली करून परवानगी द्यावी अशा सुचना दिल्यात. यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोकराव जाधव, प्रदेश संघटक आनंदराव भोंडवे, (उप सभापती प. स. खटाव) प्रदेश सचिव मनोजशेठ कोदळे, सातारा जिल्हा अध्यक्ष सचिनराव वायदंडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ईराप्पा चव्हाण, शिवाजी पवार, वसंत पवार, भिमराव चव्हाण, सर्जेराव पवार, गणेश लांडगे, अनिल अझगरे, सुभाष जाधव, दत्तु चव्हाण, सुरज वायदंडे, संतोष वेताळजे, सुशांत भिसे आदी कलाकार उपस्थित होते.








