चेन्नई/ वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्स संघातील जलद गोलंदाज जसप्रित बुमराहने आठवडाभराचा क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केला असून मंगळवारी त्याने संघसहकाऱयांसमवेत सरावाला प्रारंभ केला. बूम बूम उर्फ बुमराहने आपल्या इन्स्टाग्रामवर सरावाची काही छायाचित्रे पोस्ट केली. यात त्याचा मुंबई इंडियन्सचा संघसहकारी ख्रिस लीन सोबत होता.
बुमराहने यापूर्वी आपल्या विवाह सोहळय़ासाठी काही दिवस भारतीय संघातून रजा घेतली होती. अलीकडेच तो गोव्यातील छोटेखानी सोहळय़ात संजना गणेशन हिच्याशी विवाहबद्ध झाला असून आता आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
आपल्या ट्रेडमार्क यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱया बुमराहने मंगळवारी सराव सत्रात प्रथम फलंदाजीचा सराव करणे पसंत केले. 2013 मध्ये ताफ्यात दाखल झालेला हा दिग्गज मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मागील हंगामात मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली, त्यावेळी त्यात बुमराहचा वाटा देखील अर्थातच मोलाचा राहिला. त्यावेळी त्याने 15 सामन्यात 27 बळी घेतले होते.
मुंबई इंडियन्सतर्फे बुमराहने आतापर्यंत 92 सामन्यात 109 गडी बाद केले असून गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 14 धावात 4 बळी, अशी सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली होती. यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवणारा पहिला संघ ठरण्यासाठी मुंबई निर्धाराने मैदानात उतरणार असून साहजिकच, बुमराहकडून यंदाही त्यांना मोठय़ा अपेक्षा असणार आहेत. यंदा मुंबईची आयपीएल मोहीम दि. दि. 9 एप्रिल रोजी आरसीबीविरुद्धच्या लढतीने सुरु होत आहे.









