‘रिलायन्स इंडस्ट्रीज’नं सध्या गुंतवणूकदारांना ‘रिटेल’च्या दिशेनं खेचण्याचा सपाटा लावलाय…दुसरीकडे ‘टाटा’नं लक्ष केंद्रीत केलंय ते ‘कॉफी डे ग्रुप’च्या ‘बेव्हरिज व्हेंडिंग मशिन’ उद्योगावर. दोन्ही समूहांच्या बुलंद बेतांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ची (आरआयएल) उपकंपनी ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड’ची गाडी सध्या अक्षरशः धावतेय ती तुफानी वेगानं, ‘फॉर्म्युला वन’च्या गतीनं…मुकेश अंबानींच्या ‘आरआयएल’नं ‘रिलायन्स रिटेल’मधील 1.4 टक्के हिस्सा आबुधाबीचा ‘सॉव्हरिन वेल्थ फंड’ ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ला 6 हजार 248 कोटी रुपयांना विकलाय…मध्यपूर्वेतील एखाद्या आस्थापनाची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या ‘रिटेल’मधील ही पहिलीवहिली गुंतवणूक. ‘मुबादला’च्या तिजोरीत आहेत तब्बल 229 अब्ज डॉलर्स…गेल्या 23 दिवसांत ‘रिटेल युनिट’ला धडक दिलीय ती एकूण सहा दिग्गज, बलवान गुंतवणूकदारांनी. त्यात समावेश ‘जनरल ऍटलांटिक’ (1.75 टक्के हिस्सा, 3 हजार 675 कोटी रुपये), ‘केकेआर’ (1.28 टक्के वाटा, 5 हजार 550 कोटी रुपये), ‘सिल्व्हर लेक’ (2.13 टक्के हिस्सा, 9 हजार 375 कोटी रुपये) यांचा देखील…
त्यानंतर तीन दिवसांपूर्वीच ‘आरआयएल’कडून घोषणा झाली ती 7 हजार 350 कोटी रुपये ओतणाऱया दोन गुंतवणुकांची. त्यापैकी एक ‘टीपीजी’ची. त्यांनी 0.41 टक्के वाटय़ाकरिता 1 हजार 837 कोटी रुपये मोजलेत (‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या उपकंपनीत ‘टीपीजी’नं केलेली ही दुसरी गुंतवणूक. यावर्षाच्या प्रारंभी त्यांनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये 4 हजार 546 कोटी रुपये गुंतविले होते). त्यापाठोपाठ वार्ता आली ती सिंगापूरचं फर्म ‘जीआयसी’ 5 हजार 512 कोटी रुपये मोजून 1.22 टक्के हिस्सा घेणार असल्याची…
सहा ‘फंड्स’नी अजूनपर्यंत 7.28 टक्के हिश्श्याच्या बदल्यात एकूण 32 हजार 197 कोटी रुपये ओतल्यामुळं ‘रिलायन्स रिटेल’चं मूल्य पोहोचलंय तब्बल 4.3 लाख कोटी रुपयांवर…‘कोरोना’नं जवळपास प्रत्येक क्षेत्राला उद्ध्वस्त केलंय. पण या पार्श्वभूमीवर सुद्धा मुकेश अंबानींनी ‘ग्लोबल फंड्स’ना खेचण्यात यश मिळविलंय हे विशेष…‘मुबादला’नं ‘आरआयएल’च्या एखाद्या ‘युनिट’मध्ये दुसऱयांदा गुंतवणूक केलेली असून यापूर्वी त्यांनी ‘डिजिटल’ व ‘टेलिकॉम’ सर्व्हिसेस ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये 9 हजार 94 कोटी रुपये गुंतविले होते…‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ला एकूण 13 गुंतवणूकदारांनी कवेत धरलंय. त्यात समावेश 11 अमेरिकी नि मध्यपूर्वेतील ‘फंड्स’चा अन् दोन ‘स्ट्रटेजिक प्लेयर्स’चा…सर्वांनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’वर वर्षाव केलाय, पाऊस पाडलाय तो 1 लाख 52 हजार कोटी रुपयांचा…
‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’नं ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या आस्थापनांनाच ‘रिलायन्स रिटेल’मध्येही प्रवेश करण्याची संधी दिलीय. ‘रिटेल’ची सध्या नवीन व्यापारी डावपेचांचं दर्शन घडविण्याची तयारी चाललीय ती देशभर पसरलेल्या कंपनीच्या तब्बल 12 हजार ‘स्टोअर्स’च्या साहाय्यानं. काही दिवसांपूर्वी ‘आरआयएल’नं भारतातील दुसऱया क्रमांकाचा ‘रिटेलर’ ‘फ्युचर ग्रुप’चं अधिग्रहण केलंय…आपलं ‘रिटेल मार्केट’ तब्बल 800 अब्ज डॉलर्सचं असून दिग्गज ‘ऑनलाईन’ प्रतिस्पर्धी ‘ऍमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ यांना सामोरं जाण्यासाठी ‘रिलायन्स रिटेल’नं देशातील लाखो लहान दुकानदारांना खेचण्यास प्रारंभ केलाय…
‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या ‘रिटेल युनिट’मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अन्य आर्थिक गुंतवणूकदार देखील इच्छुक असून सर्वांचं लक्ष आहे ते कंपनीच्या येऊ घातलेल्या ‘आयपीओ’वर… ‘लिस्टिंग’मुळं ‘रिटेल’ उद्योगाचं मूल्य निश्चितच वाढणार आणि गुंतवणूकदारांना संधी मिळेल ती अंग काढून घेण्याची…दरम्यान, ‘मार्केट्स रेग्युलेटर’ ‘सेबी’ला दिलेल्या माहितीत ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या ‘ऑप्टिक फायबर’ मालमत्तेवर ताबा असलेल्या ‘डिजिटल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट’नं म्हटलंय की, त्यांनी निर्णय घेतलाय तो ‘संस्थागत गुंतवणूकदारां’कडून 14 हजार 706 कोटी उभे करण्याचा. ‘ट्रस्ट’ला ‘आरआयएल’च्याच एका उपकंपनीनं पुरस्कृत केलंय…
दुसरीकडे, भारतातील सर्वांत मोठा उद्योग समूह ‘टाटा ग्रुप’ व आपल्या देशाला ‘डोमिनोस’ नि ‘डंकिन डुनट्स’ यांचं वेड लावणारी ‘ज्युबिलंट फूड वर्प्स’ यांनी सध्या लक्ष केंद्रीत केलंय ते ‘कॉफी डे ग्रुप’च्या ‘बेव्हरिज व्हेंडिंग मशिन’ उद्योगावर…आर्थिक अडचणीत सापडलेला ‘कॉफी डे ग्रुप’ स्वप्नं पाहतोय ते 2 हजार कोटी रुपयांना खिशात घालण्याचं…विशेष म्हणजे ‘ग्रुप’नं विख्यात जागतिक ‘प्रायव्हेट इक्विटी फंड्स’ना खेचण्यात देखील यश मिळविलंय…‘टाटा समूह’ ‘शेअर मार्केट’मध्ये नोंदणी केलेल्या ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’च्या साहाय्यानं ‘करारा’ला बहुतेक जन्म देणार असून ‘113 अब्ज डॉलर्स’च्या त्या विश्वविख्यात ‘ग्रुप’मध्ये ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’नं ‘टीसीएस’ अन् ‘टायटन’पाठोपाठ तिसरा क्रमांक मिळविलाय…
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉफी डे ग्रुप’च्या विक्रीला ‘वॉरबर्ग पिनकस्’, ‘गोल्डमन सॅक्स’ आणि ‘ब्लॅकस्टोन’ या दिग्गजांनी देखील धडक देण्याची तयारी सुरू केलीय. विलीनीकरण व अधिग्रहण व्यवहाराला सुरुवात होईल ती 32.6 अब्ज डॉलर्सपासून…‘टाटा समूहा’नं म्हटलंय की, ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’नं विविध संधींची गुणवत्ता तपासण्यास प्रारंभ केलाय…‘ब्लॅकस्टोन’नं यंदा एका स्थानिक ‘रिअल इस्टेट डेव्हलपर’सह बेंगलुरूमधील ‘कॉफी डे ग्रुप’चं ‘ऑफिस पार्क’ 2 हजार 700 कोटी रुपयांच्या साहाय्यानं घशात घातलंय…‘हॉट बेव्हरिज व्हेंडिंग मशिन’ उद्योगाचा तब्बल 90 टक्के हिस्सा ‘शेअर बाजारा’त नोंदणी केलेल्या ‘कॉफी डे एंटरप्राईझेस’ची उपकंपनी ‘कॉफी डे ग्लोबल’च्या मुठीत असून ‘कॉफी डे एंटरप्राईझेस’च्या ‘शेअर्स’वर निलंबनाला सामोरं जाण्याची पाळी आलीय. कारण आस्थापनाला योग्य वेळी आर्थिक निकाल जाहीर करणं जमलं नव्हतं…
गेल्या वर्षी संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी अचानक आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यामुळं ‘कॉफी डे ग्रुप’वर सध्या पाळी आलीय ती कर्जांची परतफेड करण्यासाठी मालमत्ता विकण्याची…‘व्हेंडिंग मशिन’ उद्योग विकत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींशी ‘ग्रुप’ची चर्चा चाललीय, पण अजूनपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत ती पोहोचलेली नाहीये’, प्रवक्त्याचे शब्द…‘कॉफी डे ग्लोबल’च्या मुठीत ‘व्हेंडिंग मशिन’ उद्योगाप्रमाणंच अन्य ‘रिटेल बिझनेस’ सुद्धा असल्यानं ‘ग्रुप’ला त्या व्यवसायाला विकण्यापूर्वी ‘डिमर्ज’ करावं लागेल…‘टाटा कंझ्युमर’ ‘फूड’ व ‘बेव्हरिज’ला नवीन दिशा दाखविण्यासाठी प्रचंड इच्छुक असल्यानं कंपनीनं ‘कॉफी डे’च्या ‘व्हेंडिंग मशिन’ उद्योगाचं इतरांचा पराभव करून अधिग्रहण केल्यास फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. आस्थापनानं काही दिवसांपूर्वी अधिग्रहण केलंय ते ‘टाटा केमिकल्स’च्या ‘पॅकेज्ड प्रॉडक्ट्स युनिट’चं. शिवाय ‘टाटा-स्टारबक्स’ या ‘कॉफी चेन’नं जोरदार मुसंडी मारलीय…‘टाटा समूह’ कॉफीची लागवड करत असल्यामुळं ‘ग्रुप’ला ‘सप्लाय चेन’ नि कच्चा माल यांच्याविषयी काळजी करण्याचीही गरज नाही. ‘समूहा’ला ‘रिटेल’चा भरपूर अनुभव मिळालाय तो ‘स्टारबक्स’शी असलेल्या भागिदारीमुळं. खेरीज ‘टाटा’ला या उद्योगाला न्याय देणं शक्य होईल ते प्रचंड आर्थिक शक्तीमुळं !
‘वॉलमार्ट’चा डोळा ‘सुपर ऍप’वर…
मुकेश अंबानींनी ‘रिटेल’मध्ये आस्थापनांना ओढण्याचा जो सपाटा लावलाय त्या पार्श्वभूमीवर सावध झालेल्या ‘वॉलमार्ट’नं ‘टाटा समूहा’कडून उतरविण्यात येणाऱया आणि मीठापासून सॉफ्टवेअर सेवांपर्यंतचा समावेश राहणार असलेल्या ‘सुपर ऍप’चा मोठय़ा प्रमाणात हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू केल्याचं वृत्त बाहेर फुटलंय. ही गुंतवणूक 20 ते 25 अब्ज डॉलर्स इतकी अगडबंड राहू शकते (तसं झाल्यास देशाच्या रिटेल क्षेत्रातील तो सर्वांत मोठा सौदा ठरेल. यापूर्वी 2018 मध्ये ‘वॉलमार्ट’नं ‘फ्लिपकार्ट’चा 66 टक्के हिस्सा खरेदी केला होता तो 16 अब्ज डॉलर्सना). सदर ‘ऍप’ यंदा डिसेंबर वा येत्या जानेवारी महिन्यात अवतरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळं ‘टाटां’च्या ‘ई-कॉमर्स’ व्यवसायाबरोबर ‘फ्लिपकार्ट’लाही मोलाचा आधार होईल…
– राजू प्रभू