कोलकाता/प्रतिनिधी
कोलकाताच्या सॉल्ट लेक सिटीच्या लेक टाऊन परिसरात दुबईच्या बुर्ज खलिफाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. दुर्गा पूजा पंडालसाठी बुर्ज खलिफावर लेझर लाईट शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या लेझर लाईट शोमुळे कोलकाताची विमान वाहतूक सेवा ठप्प झाली. ३ वेगवेगळ्या पायलटने या संदर्भात कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बुर्ज खलिफावर सुरू असलेला लेझर लाईट शो बंद करावा लागला.
दरम्यान, दुबईतील बुर्ज खलिफा या गगनचुंबी इमारतीची प्रतिकृती पूर्व कोलकाताच्या श्रीभूमी दुर्गा पूजा पंडालने बनवली आहे. मात्र, येथील लेझर शो सोमवारी संध्याकाळी रद्द करण्यात आला आहे. तीन वैमानिकांनी शहराच्या विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवरकडे तक्रार केल्यावर हा शो रद्द करण्यात आला. हे विमानतळ पूजेच्या ठिकाणापासून जवळ असल्याने लेझर शोच्या लाईट्समुळे वैमानिकांना विमानाच्या लँडिंगदरम्यान अडचणी येत होत्या, त्यामुळे पोलिसांनी आयोजकांना हा शो रद्द करायला लावला.
एटीसीला वैमानिकांकडून तक्रारी प्राप्त होताच त्यांनी स्थानिक पोलिसांना कळवले आणि लेझर शो बंद केला. त्यानंतर कोणतीही समस्या उद्भवलेली नाही,” असे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.
तसेच राज्य मंत्री आणि श्री भूमी स्पोर्टिंग क्लबचे प्रमुख सुजीत बोस यांना याबद्दल विचारले असता त्यांनी आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही. तर लोकांची मोठी गर्दी असल्याने पंडालमध्ये दिवे कमी करण्यात आले, असे ते म्हणाले.









