ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तिथे दररोज काही ना काही दहशतवादी घडामोड घडताना दिसते. त्याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी संध्याकाळी एका बुरखाधारी दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून हल्ला केला आहे. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली महिला आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ही बुरखा घातलेली व्यक्ती रस्तात थांबून पिशवीत काहीतरी घोळत असून ती इकडे तिकडे पाहते आणि बॅगमधून एक संशयास्पद वस्तू बाहेर काढते. बुरखा घातलेल्या व्यक्तीने पिशवीतून एका वस्तू बाहेर काढत ती वस्तू सीआरपीएफच्या बंकरच्या दिशेनं फेकते आणि या ठिकाणी आग लागल्याचं पाहायला मिळतं.
बुरखा घातलेल्या महिलेने रस्त्यावर थांबून पिशवीतून पेट्रोल बॉम्ब फेकल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. स्फोटनंतर तेथे गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागतात. काही लोक बादल्यांमध्ये पाणी भरून आग विझवताना दिसत आहेत. ही घटना घडत असताना रस्त्यावरून ये-जा करणारे अनेकजण दिसतात. अनेक मोटारसायकल आणि कारही रस्त्यावरून येताना दिसतात.