सेन्सेक्स, निफ्टी अंशतः घसरत बंद ः भारती एअरटेल नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक नकारात्मक वातावरणाच्या सावलीत भारतीय शेअरबाजार बुधवारीदेखील घसरणीसह बंद झाला होता. बुधवारच्या सत्रात भारती एअरटेल ही कंपनी सर्वाधिक नुकसानीत राहिली होती. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 10 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 60,106 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 18 अंकांच्या घसरणीसह 17,896 अंकांवर बंद झाला होता. भारती एअरटेलचा समभाग 3 टक्के तर हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग 2 टक्के इतका घसरला होता. तर सन फार्माचा समभाग मात्र याउलट बाजारात चमकताना दिसला. कॅन्सररोधक पाल्बोसीक्लीब या औषधाचे लाँचिंग कंपनीने केल्याने समभाग बाजारात वधारला होता. बाजारात दिवसभरात चढउतार राहिला होता.
नेस्ले, सिप्ला, डिव्हीस लॅब्ज, अपोलो हॉस्पिटल, इंडसइंड बँक, रिलायन्स, टायटन व बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग जवळपास 1 ते 3 टक्के इतके घसरलेले होते. तर दुसरीकडे बाजारात तेजी राखणाऱयांमध्ये सन फार्मा, हिंडाल्को, बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, एचडीएफसी, टाटा मोटर्स, एल अँड टी व आयसीआयसीआय बँक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विविध क्षेत्राच्या निर्देशांकाचा विचार करता एफएमसीजी, फार्मा, ऑटो आणि तेल क्षेत्राच्या निर्देशांकांनी नकारात्मक कामगिरी नोंदवली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक व धातू निर्देशांक मात्र बुधवारी तेजी राखून होते.
बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत होते. शोभा आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे समभाग चांगले तेजीत होते. डिसेंबर तिमाहीत या दोन्ही कंपन्यांनी घर विक्री बुकिंगमध्ये लक्षणीय कामगिरी केली होती. बुधवारी गुंतवणूकदारांचे जवळपास 52 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य कमी होत 280.30 लाख कोटी रुपयांवर आले होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 समभाग तेजीसह बंद झाले होते. दिवसभरात निफ्टी निर्देशांक सपाट पातळीवर व्यवहार करत होता. जागतिक मंदीची भीती बाजारावर दिसते आहे.









