सांगली/प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील बुधगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट ऑफिस फोडले. चोरीच्या या घटनेत ग्रामपंचायत मधील सीसीटीव्हीची सेंट्रल यंत्रणा चोरट्यांनी पळवली आहे. तसेच पोस्ट ऑफिस मध्येही चोरट्यांनी हात मारला.
शुक्रवारी पहाटे हा चोरीचा प्रकार घडला असून पंचायतीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा चोरीस गेली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये मात्र रोख रक्कम चोरीस गेली आहे काय या दृष्टीने पोलिसांचा तपास आणि पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. बुधगाव पोस्ट ऑफिस मध्ये यापूर्वीही एकदा चोरी झाली होती. ग्रामपंचायत पोस्ट ऑफिस अगदी समोरासमोर आहे. येथे रोडवर रात्री बारा वाजेपर्यंत लोक जागे असतात. पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीचे कर्मचारी कोरोनाच्या संकटामध्ये झुंज देत असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसापूर्वी बुधगाव मधील भर चौकातील हनुमान मंदिर फोडले होते. दरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्यांच्या हाती रोख रक्कम किंवा काही महत्त्वाचे हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले.








