प्रतिनिधी / सांगली
बुधगाव तालुका मिरज येथील दोन दिव्यांग खेळाडूंनी कळसुबाई शिखर सर केले आहे. जयश्री राजाराम शिंदे व माधुरी मकरंद पाटील या दोघींनी गिर्यारोहन मोहिमेत सहभाग घेतला. औरंगाबाद येथील शिवूर्जा प्रतिष्ठानने या मोहिमेचे आयोजन केले होते. यात राज्यभरातील 70 दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींचे मनोबल वाढविण्यासाठी औरंगाबाद येथील शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील 9 वर्षांपासून कळसुबाईवर शिखऱ चढाई करतात. अशाच प्रकारे यावेळी ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईवर चढाई करून या शिखरावरून उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचे करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये राज्यभरातील 70 दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. या गिर्यारोहण मोहिमेत सकाळी चढाईस सुरवात केली होती. सोबतच्या दिव्यांग सहकाऱ्यांना आधार देत संध्याकाळी कळसुबाईवर यशस्वीरीत्या चढाई करून शिखर सर केले. १६४६ मी. उंचीवर कडाक्याच्या थंडीत तंबूमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करत एक प्रेरणादायी आशावाद निर्माण केला. यावेळी मोहिमेत वैभव बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते ही उपस्थित होते.









