वृत्तसंस्था/ चेन्नई
फिडेच्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने सलग तीन विजय मिळविताना झिम्बाब्वे, व्हिएतनाम, उझ्बेकिस्तान यांच्यावर मात केली.
भारताने झिम्बाब्वेचा 6-0 असा धुव्वा उडविला तर व्हिएतनामला 4-2 असे नमविले. मात्र उझ्बेकवर मिळविलेला विजय विशेष लक्षणीय ठरला. भारताने उझ्बेकविरुद्धची लढत 5.5-0.5 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. प्रत्येक फेरी जिंकल्याने भारताने 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले असून 18 पैकी 15.5 असे सर्वोत्तम डावाचे गुणही मिळविले आहेत.
चीनचेही भारताइतकेच गुण झाले आहेत. मात्र सर्वोत्तम डाव गुणांत (13.5) ते भारतापेक्षा बरेच मागे आहेत. त्यामुळे चीन दुसऱया व जर्मनी तिसऱया (11.5) स्थानावर आहे. बलाढय़ चीनने फक्त इंडोनेशियावर 4-2 अशी मात केली. पहिल्या दोन फेऱयांत न खेळलेल्या आनंदला उझ्बेकच्या नॉदिरबेक अब्दुसत्तोरोव्हने 76 चालीत बरोबरीत रोखले. पी. हरिकृष्ण, आर. प्रज्ञानंद, कोनेरू हंपी, डी. हरिका, वंतिका अगरवाल यांनी आपापले सामने जिंकून भारताचा मोठा विजयही निश्चित केला. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या लढतीत विदित गुजराथी, अरविंद चिदम्बरम, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली, निहाल सरिन, दिव्या देशमुख यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळविले. दुसऱया फेरीत गुजराथी, हरिकृष्ण यांचे सामने अनिर्णीत राहिले तर कोनेरू हंपी, डी. हरिका, निहाल सरिन यांनी विजय मिळविले आणि दिव्या देशमुखला मात्र पराभव स्वीकारावा लागला.









