वार्ताहर/तवंदी :
बुदलमुख (ता. निपाणी) येथे तंबाखू पिकाच्या लावणीसाठी तयारी म्हणून शेतातील औत मारण्याच्या कामाची लगबग शेतकरी वर्गाकडून सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी सध्या या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
निपाणीसह यरनाळ, बुदलमुख परिसरात प्रामुख्याने तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. बुदलमुख परिसरामध्ये सुमारे 350 एकर शेती आहे. यापैकी सुमारे 150 एकर परिसर क्षेत्रामध्ये तंबाखू पिकाचे उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पिकांचे उत्पादन बऱयापैकी झाले आहे. सध्या तंबाखू पिकासाठी रान तयार करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे शेतकरी या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. सध्या शाळादेखील बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील शेतीकामांना मदत करीत आहेत. साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी तंबाखू लावणीस प्रारंभ केला जातो. या पार्श्वभूमीवर सध्या तंबाखू पिकासाठी रान तयार करण्यास या भागात सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.









