कोगनोळी : ज्यांनी अखंड हरिनाम घेतलेले आहे, त्यांच्या वाणीला महत्त्व असते. नाम हे सुलभ व सोपे आहे ते घेतल्याने वाणी पुण्यवंत होते तर देह पवित्र होतो, असे विचार जोगेवाडी (ता. राधानगरी) येथील नारायण एकल महाराज यांनी व्यक्त केले. बुदलमुख (ता.निपाणी) येथील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवेत ते बोलत होते.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत !
जो वदे अच्यत सर्वकाळ !!
तयाच्या चिंतने तरतील दोष !
जळतील राशी पातकांच्या !!
या अभंगावर निरुपण करताना एकल महाराज पुढे म्हणाले, आशीर्वाद कधीही मागून घेऊ नये तो द्यावा. प्रारब्ध फिरवायची ताकद फक्त संतांमध्येच आहे. जो स्वतः अगोदर काम करतो व नंतर सांगतो त्याला अधिकार प्राप्त होतो, असेही शेवटी एकल महाराज यांनी सांगितले. यावेळी पेरणोली, मासा बेलेवाडी, शिप्पूर, मळगे, पांगिरे व बुदलमुख पंचक्रोशीतील वारकरी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.