कोरोनामुळे जलतरण तलावाचे काम अपूर्ण : कचरा साचत असल्याने तलावाची दुर्दशा, नागरिकांमधून नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव
लक्ष्मीटेकडी येथील बुडा कॉलनीमध्ये जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री विकास योजनेंतर्गत कोटय़वधीचा निधी खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या जलतरण तलावाचे काम अर्धवट झाले आहे. कोरोनामुळे हे काम रखडले. या कामाची पूर्तता करून जलतरण तलाव कधी खुला करणार अशी विचारणा होत आहे.
मुख्यमंत्री शहर विकास योजनेंतर्गत महापालिकेला चारवेळा 100 कोटीचे अनुदान मंजूर झाले होते. याअंतर्गत विविध विकास कामे राबविण्यात आली आहेत. मात्र काही विकासकामे अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्याने याची पूर्तता कधी होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री विकास निधी अंतर्गत अशोकनगर, हनुमाननगर आणि लक्ष्मीटेकडी येथील बुडा कॉलनीमध्ये उद्यान आणि जलतरण तलावाच्या निर्मितीसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. यापैकी अशोकनगर येथील क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. पण कंत्राटदाराअभावी सदर क्रीडा संकुल दोन वर्षापासून टाळेबंद आहे. तसेच हनुमाननगर येथील उद्यान, खुली जीम आणि जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले असून, जलतरण तलाव वगळता उद्यान व जीम नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र जलतरण तलावाचे उद्घाटन अद्यापही झाले नाही.
तसेच बुडा कॉलनी, लक्ष्मीटेकडी येथे उद्यान आणि जलतरण तलाव निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यापैकी उद्यानाचे काम पूर्ण झाले होते. मात्र जलतरण तलावाचे काम अपूर्ण राहिले आहे. मागील वषी उर्वरित काम हाती घेण्यात आले होते. या ठिकाणी चेंजिंग रूमची आवश्यकता असल्याने नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. मात्र जलतरण तलावाचे काम अद्यापही अर्धवटच आहे. कोरोनामुळे हे काम पूर्ण करण्यात आले नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही हे काम पूर्ण करण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
सदर जलतरण तलावात कचरा साचला असून, या ठिकाणचे साहित्यही खराब होत आहे. त्यामुळे या जलतरण तलावाचे काम कधी पूर्ण होणार आणि नागरिकांसाठी कधी खुला होणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









