बेमुदत आंदोलन करण्यास सुरुवात : बुडाने एनओसी देण्याची मागणी, 15 वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरूच
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाने 61 क्रमांक योजना राबविण्यासाठी कणबर्गी येथील शेतकऱयांच्या जमिनी कब्जात घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही शेतकऱयांनी त्याला विरोध केला. जवळपास 50 एकरमधील शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ही स्कीम खोळंबली आहे. असे असताना बुडा शेतकऱयांना त्या ठिकाणी काहीच करण्यास मुभा देत नाही. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो असून आम्हाला बुडाने एनओसी द्यावी, या मागणीसाठी सोमवारी येथील बुडा कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
कणबर्गी येथील सदर जमीन 2007 मध्ये कब्जात घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध केला होता. मात्र काही शेतकऱयांना भीती दाखवून तसेच दहशत दाखवून काही रिअल इस्टेट एजंटांनी केवळ 15 ते 18 लाखांना एकरप्रमाणे जमिनी घेतल्या आहेत. ती जमीन संबंधित मूळ मालकालाच द्यावी, अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली आहे.
एकूण 160 एकर जमीन आहे. त्यामधील 80 एकर रिअल इस्टेटधारकांनी घतेली आहे तर 50 एकर जमिनी संदर्भातील शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 15 वर्षांपासून आम्ही न्यायालयात लढा देत आहे. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. तेव्हा बुडाने या जमिनीचा हक्क सोडावा आणि आम्हाला या जमिनीमध्ये घरे बांधण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली
आहे.
कुटुंबासह ठाण मांडण्याचा इशारा
बुडा कार्यालयासमोर स्वयंपाक करून ठाण मांडले आहे. मंगळवारपासून संपूर्ण कुटुंबासह आम्ही ठाण मांडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत ठोस निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आम्ही लढा लढू, असा इशारा दिला आहे.
या आंदोलनात बबन मालाई, भवानी मालाई, कृष्णा मालाई, महादेव मालाई, इराप्पा अष्टेकर, नारायण अष्टेकर, किसन येळ्ळूरकर, बसू येळ्ळूर, टोपाण्णा अष्टेकर, विश्वनाथ चरंतीमठ, विनायक चरंतीमठ यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









