नव्याने निविदा मागविण्याची वेळ
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रामतीर्थनगर येथे समाज मंदिर आणि व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच याकरिता साडेपाच कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा तांत्रिकदृष्टय़ा अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रामतीर्थनगर परिसरात रहिवासी वसाहत निर्माण करून विविध विनियोगासाठी खुल्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. येथील जागेवर समाज भवन आणि व्यापारी संकुल उभारणीसाठी बुडाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडून मंजुरी घेण्यात आली होती. बुडाकरिता उत्पन्नाचे स्त्राsत निर्माण करण्याच्यादृष्टीने बहुमजली व्यापारी संकुल आणि अत्याधुनिक पद्धतीचे समाज भवन उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. याकरिता साडेपाच कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. सदर प्रस्तावाच्या अंमलबजावणीकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर निविदा मागविण्यात आल्यानंतर शासनाच्यावतीने मूल्यांकन करण्यात आले. मात्र सदर निविदा तांत्रिकदृष्टय़ा अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे समाज भवन आणि व्यापारी संकुलासाठी नव्याने निविदा मागविण्याची गरज आहे.
बहुमजली समाज भवनमध्ये पार्किंग, राहण्याची सुविधा आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधांनीयुक्त अशी इमारत उभारण्यात येणार आहे. पण निविदा दाखल केलेले कंत्राटदार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे नव्या निविदांकरिता बुडाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी हा प्रस्ताव मार्गी लागण्यास आणखी सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्मयता आहे.









