कणबर्गी योजनेतील विकासकामांना लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्यावतीने वसविलेल्या विविध वसाहतींमध्ये विकासकामे राबविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 56 कोटी अनुदानांतर्गत दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात विकासकामे राबविण्यात येणार आहेत. 28 कोटी अनुदानातून दक्षिण भागातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार असून या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.
बुडाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी वसाहत योजना राबविण्यात आल्या आहेत. यापैकी काही वसाहत योजना महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आल्या आहेत. काही वसाहती बुडाच्या अखत्यारित आहेत. रामतीर्थनगर वसाहतीमधील रस्ते व गटारी खराब झाल्याने हस्तांतराची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे ही विकासकामे राबविण्यासाठी 28 कोटी अनुदानाची तरतूद केली होती. सदर निधी अंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या अंतर्गत उत्तर मतदारसंघात समुदाय भवन, व्यापारी संकुल आणि रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.
काही विकासकामे हनुमाननगर येथील कुमारस्वामी लेआऊटमध्ये राबविण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कुमारस्वामी लेआऊट महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले. तसेच दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी 28 कोटी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार विविध रस्त्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता. पण काही रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आल्याने मंजूर झालेल्या निधीमधून अन्य रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. याकरिता निधीच्या विनियोगात बदल करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला होता. तसेच कणबर्गी योजनेतील विकासकामे राबविण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.
मात्र अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दक्षिण मतदारसंघातील विकासकामांच्या विनियोगात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पण कणबर्गी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया कामाला मंजुरी देण्यात आली नाही. येत्या आठवडय़ाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.









