प्रतिनिधी/ बेळगाव
बुडाने निर्माण केलेल्या वसाहतींमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यासह विकासकामे राबविण्याकरिता निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे बुडाच्या मालकीचे भूखंड विक्री करण्यासाठी ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 43 पैकी 40 भूखंडांकरिता नागरिकांनी बोली लावली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बुडाने ठिकठिकाणी रहिवासी वसाहती निर्माण केल्या आहेत. या वसाहती महापालिकेकडे हस्तांतर करण्याची आवश्यकता होती. पण ही प्रक्रिया लांबली असल्याने वसाहतीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या गटारी, रस्ते व अन्य सुविधांची दुरवस्था झाली आहे. या गटारी व रस्त्यांची दुरुस्ती करून वसाहती महापालिकेकडे हस्तांतर करण्यात याव्यात, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे कणबर्गी, ऑटोनगर, रामतीर्थनगर आणि कुमारस्वामी लेआऊट अशा वसाहतींमधील विकासकामे राबविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. याकरिता बुडाच्या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार कुमारस्वामी लेआऊटमधील 43 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. 50 हजार रुपये भरून या प्रक्रियेत सहभाग घेण्याची मुभा होती. 43 पैकी 40 भूखंडांकरिता नागरिकांनी बोली लावली आहे. त्यामुळे या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. भूखंडांना बुडाच्या अपेक्षेप्रमाणे दाम मिळाला असल्याने 40 भूखंडधारक पात्र ठरले आहेत. त्यांना रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र 43 पैकी 3 भूखंडांचा आकार जास्त असल्याने कोणीच बोली लावली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









