मोहाली / वृत्तसंस्था
बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या मध्यवर्ती करारात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचे डिमोशन करण्यात आले. बीसीसीआयने ए प्लस, ए, बी, सी असे चार गट केले असून ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी तर ए, बी व सी या 3 ग्रेडकरिता अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी व 1 कोटी रुपये मानधन प्रदान केले जाणार आहे.
यापूर्वी अ गटात समाविष्ट असलेल्या पुजारा व रहाणे यांना बी ग्रेडमध्ये टाकले गेले आहे. हे दोन्ही अनुभवी फलंदाज सातत्याने खराब फॉर्ममध्ये राहिले असून त्यांना आगामी लंकेविरुद्ध कसोटी मालिकेतून वगळले गेले आहे. नवी वेतनश्रेणी दि. 20 जानेवारीपासून लागू केली जाणार असल्याचे नियामक मंडळाने यावेळी जाहीर केले. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रित बुमराह यांना ए प्लस गेडमध्ये स्थान मिळाले आहे.

अलीकडे बऱयाच दुखापतींना सामोरे जावे लागलेल्या अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे डिमोशन सर्वाधिक धक्कादायक ठरले. त्याला ए ग्रेडमधून थेट सी ग्रेडमध्ये ढकलण्यात आले आहे. कसोटी संघातून डच्चू मिळालेला वादग्रस्त यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला बी ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये जावे लागले आहे. साहाने यापूर्वी निवडीबाबत आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत जाहीरपणे टीका केली होती. आता तो सी ग्रेडमध्ये फेकला गेला असून भारतीय संघातर्फे त्याला आणखी संधी मिळण्याची शक्यताही अंधुक आहे.
मागील वेळी 28 क्रिकेटपटूंना मुख्यवर्ती करार बहाल करण्यात आले होते. यंदा मात्र 27 क्रिकेटपटूंचा यात समावेश आहे. यापूर्वी अ गटात 10 खेळाडूंचा समावेश होता. यंदा मात्र रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, रिषभ पंत, केएल राहुल व मोहम्मद शमी अशा पाच खेळाडूंना आपला करार जैसे थे राखता आला आहे. हार्दिक पंडय़ाप्रमाणेच शिखर धवन देखील ए ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये फेकला गेला आहे. धवन सध्या वनडेच्या एकाच क्रिकेट प्रकारात खेळत आहे.
निराशाजनक कामगिरीचा कुलदीप यादव व नवदीप सैनी या दोघांनाही फटका बसला. फारसे सातत्य राखू न शकलेला मयांक अगरवाल बी मधून सी ग्रेडमध्ये फेकला गेला आहे. मोहम्मद सिराजला उत्तम योगदानाची पोचपावती मिळत तो बी ग्रेडमध्ये पोहोचला.
महिला गटात दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड यांचे प्रमोशन झाले असून त्या हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना व पूनम यादव यांच्यासह ए ग्रेडमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. ए ग्रेडसाठी वार्षिक 50 लाख रुपयांचे मानधन दिले जाते. मिताली राज व झुलन गोस्वामी बी ग्रेडमध्ये (30 लाख रुपये) कायम राहिले तर जेमिमा रॉड्रिग्यूजचे बी ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये (10 लाख रुपये) डिमोशन झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढतीची केंद्रे जाहीर
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी पाच केंद्रे निश्चित केली असून 5 टी-20 सामने अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, दिल्ली, राजकोट व चेन्नई येथे खेळवले जाणार असल्याचे जाहीर केले. ही मालिका आयपीएल झाल्यानंतर जूनमध्ये होणार आहे.









