वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोठय़ा स्पर्धा सहजतेने आयोजित करण्याचा विश्वास असल्यामुळे बीसीसीआयने तीन मोठय़ा स्पर्धांच्या आयोजनाची मागणी आयसीसीकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दोन मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धांचाही समावेश आहे. 2024 पासून सुरू होणाऱया आठ वर्षाच्या सायकलमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
बीसीसीआय एमर्जन्ट अपेक्स कौन्सिलच्या व्हर्च्युअल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एक चॅम्पियन्स ट्रॉफी, एक टी-20 विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक स्पर्धा आयोजनाची मागणी बीसीसीआय आयसीसीकडे करणार असल्याचे समजते. ‘2025 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2028 टी-20 विश्वचषक आणि 2031 वनडे विश्वचषक या स्पर्धांच्या आयोजनाची आम्ही मागणी करणार आहोत,’ असे एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. 2017 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आलेली नाही. पण पुढील एफटीपीमध्ये त्याचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचे आयसीसीने अलीकडेच जाहीर केले होते. त्यानुसार भारत या स्पर्धेची मागणी करणार आहे.
‘चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा छोटय़ा स्वरूपाची असल्याने बरीच लोकप्रियही आहे. त्यामुळे 2023 ची विश्वचषक स्पर्धा आयोजित केल्यानंतर 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाची मागणी करणे रास्तच ठरणार आहे. दर दोन किंवा तीन वर्षांनी मोठी स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता भारताकडे असल्यामुळेच आम्ही तीन स्पर्धांची मागणी करणार आहोत,’ असेही या अधिकाऱयाने सांगितले. एफटीपीच्या पुढील कार्यक्रमात वनडे विश्वचषक स्पर्धा 14 संघांत खेळविण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे तर टी-20 विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या 16 वरून 20 पर्यंत वाढविण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.
दहा सदस्यीय समिती नियुक्त
गेल्या मोसमात रणजी करंडक स्पर्धा कोरोना महामारीच्या कारणास्तव रद्द करावी लागली होती. त्यामुळे या स्पर्धेत खेळणाऱया अनेक क्रिकेटपटूंचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची भरपाई करण्यासाठी बीसीसीआयने एक दहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये सहा विभागातील प्रत्येकी एक प्रतिनिधीसह चार ऑफिस बेअरर्सचा समावेश असेल. या ऑफिस बेअरर्समध्ये अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांचा समावेश असेल, असे या अधिकाऱयाने सांगितले. ही समिती कोणाला किती भरपाई द्यावी, याचा निर्णय घेणार आहे. रणजी करंडकमधील खेळाडूंना सध्या प्रत्येक सामन्यात 1.40 लाख रुपये मानधन दिले जाते. याशिवाय बीसीसीआयच्या उत्पन्नातील बऱयापैकी वाटाही त्यांना देण्यात येतो. आयपीएल सोडून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणारा स्थानिक क्रिकेटपटू वर्षाला सुमारे 20 लाख रुपयांची कमाई करतो. पण गेल्या वर्षी त्यांना हे उत्पन्न मिळू शकले नाही. सईद मुश्ताक अली टी-20 आणि विजय हजारे वनडे करंडक या दोनच स्पर्धा खेळविण्यात आल्या होत्या. यातील प्रत्येक सामन्याला प्रत्येकी 35,000 रुपये मानधन देण्यात येते.









