वृत्तसंस्था/ सिडनी
येत्या डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघामध्ये चार कसोटी व मर्यादित षटकांचे सामने खेळविले जाणार आहेत. दरम्यान ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघासाठी क्वारंटाईनचा कालावधी कमी करण्याची भारतीय क्रिकेट मंडळातर्फे करण्यात आलेली विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून फेटाळण्याची शक्यता असल्याचे वृत्त येथील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
क्रिकेटच्या सामन्यासाठी कोरोना संदर्भातील नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या कोरोना नियमानुसार गेल्या जुलैमध्ये इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील कसोटी मालिका खेळविली गेली होती. प्रत्येक क्रिकेटपटूसाठी क्वारंटाईनचा कालावधी दोन आठवडय़ांचा सक्तीचा करण्यात आला असून मैदानावर प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक क्रिकेटपटूची कोरोना चांचणी घेतली जाते. क्विन्सलँडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी कोरोनाच्या भीतीमुळे आपले नियम अधिक काटेकोर केले आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयात ब्रिस्बेनमध्ये दाखल होईल त्यावेळी त्यांचा क्वारंटाईन कालावधी कमी करावा, अशी विनंती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली आहे पण गांगुलीची ही विनंती फेटाळली जाईल, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियात दाखल होणाऱया न्यूझीलंड महिला क्रिकेट संघालाही क्विन्सलँडमध्ये 14 दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. संयुक्त अरब अमिरातमधील आयपीएल क्रिकेट स्पर्धा 10 नोव्हेंबरला संपणार आहे. या स्पर्धेनंतर भारताचे क्रिकेटपटू थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार असल्याचे समजते.









