प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड-19 वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी तुफान दगडफेक करीत रुग्णवाहिका पेटविली. वॉर्डमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळ स्टाफने धरणे आंदोलन केले. यावेळी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळामधील सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान जिल्हाधिकारी एम. जी हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन अशा घटना भविष्यात घडणार नाहीत, यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्यात घेईल तसेच जिल्हा तसेच तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी आवश्यक सोयी, सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.









