रमेश भोसले/महागाव
ज्या दिवशी इंग्लंडच्या पंतप्रधानपदी वेस्टर्न चर्चील आरूढ झाले त्याच दिवशी म्हणजे 11 मे 1940 रोजी बीबीसी हिंदी रेडीओचे पहिले प्रसारण झाले. बीबीसी हिंदी सर्व्हीस अशा नावाने हे रेडीओ केंद्र सुरू झाले. त्यावेळचे भारतातील प्रसिध्द रेडीओ प्रसारक जुल्फिकार बुखारी यांनी आपल्या निवेदनाने याची सुरवात केली होती. ‘अगर सभी खबर चाहिये तो बीबीसी सुनिये, यह हम नही कहते दुनिया कहती है’ ही नवी म्हण त्यावेळी सर्वत्र प्रचलित झाली होती. सव्वाकोटीहून अधिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱया बीबीसी हिंदी रेडीओचे 31 जानेवारी 2020 रोजी शेवटचे प्रसारण करून बीबीसी हिंदी रेडीओ श्रोत्यांना कायमचा अलविदा करणार आहे. नोव्हेंबर महिन्यात हिंदी विभागप्रमुख मुकेश शर्मा यांनी बीबीसीच्या शेवटच्या प्रसारणाची जाहिर केली आणि श्रोत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
दुसऱया महायुध्दाच्यावेळी भारतीय उपमहाद्विपात असलेल्या आपल्या ब्रिटीश सैनिकांपर्यंत जगातील ताज्या घडामोडी पोहोचाव्यात यासाठी बीबीसी हिंदूस्तानी सर्व्हीस अशा नावाने हे रेडीओ केंद्र सुरू झाले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 रोजी भारतीय विभागाची स्वतंत्र सुरवात करण्यात आली. बलराज सहानी, जॉर्ज ऑरवेल हे त्यावेळी बीबीसीच्या श्रोत्यांच्या आवडीचे निवेदक होते. यानंतर पुरूषोत्तमलाल पहावा, आले हसन, हरिश्चंद्र खन्ना, रत्नाकर भारतीय यांनी हिंदी रेडीओवर प्रसिध्दीची झेंडे फडकविले. 1950 च्या दशकात इंद्रकुमार गुजराल बीबीसी हिंदी रेडीओवर पत्रकारीता आणि प्रसारण कौशल्य क्षेत्रात आले. पुढे 47 वर्षानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. 1960 नंतर महेंद्र कौल, हिमांशु कुमार भादुडी, ओंकारनाथ श्रीवास्तव, कैलाश बुधवार, भगवानप्रकाश, विश्वदिपक त्रिपाठी, सुभाष ओहरा, परवेज आलम, अचला शर्मा, शिवकांत, ममता गुप्ता, मधुकर उपाध्ये, पंकज पच्योची, सिमा चिश्ती, सलमा जयदी, शाजी जमा, संजिव श्रीवास्तव असे लोक बीबीसी हिंदी सेवेसाठी पत्रकार आणि निवेदक म्हणुन पुढे आले. त्यांनी आपल्या वेगळय़ा शैलीतून मंत्रमुग्ध आवाजाने श्रोत्यांच्या मनात कायमचे घर केले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या असो, बांग्लादेशाची लढाई असो अशासह अनेक आंतरराष्ट्रीय लहान मोठय़ा घटना असो प्रत्येकवेळी बीबीसीने आपल्या स्पष्ट पारदर्शी पत्रकारीतेचे प्रसारण करून श्रोत्यांना आपल्या विश्वासाचे प्रत्यंतर दिले आहे. फक्त इंग्लंडच नव्हे, तर देशातील सर्व राज्याच्या राजधानी ठिकाणी बीबीसीचे पत्रकार रात्रंदिवस कार्यरत राहिले. 1994 रोजी भारतासाठी दिल्लीत बीबीसीचे स्वतंत्र प्रसारण कार्यालय सुरू झाले. 1999 मध्ये देशातील लहान मुलांच्या जीवन स्थितीवर आधारीत आकांक्षा ही 13 भागांची मालिका बीबीसीने ऐकवली. या मालिकेसह राजकीय, मनोरंजन, क्रिडा, विज्ञान, आंतरराष्ट्रीय घटनांवर सर्वंकश माहितीच्या मालिका सादर करून श्रोत्यांना प्रभावित केले. सकाळी 6.30 वाजता नमस्कार भारत हे 30 मिनिटाचे आणि संध्याकाळी 7.30 वाजता दिनभर हा एक तासाचा कार्यक्रम बीबीसी सादर करीत होती. यापुर्वी रात्री साडे दहा ते आकरा याववेळत अर्धातास कार्यक्रम सादर केला जात असे पणे तो कालांतराने बंद करण्यात आला. डिसेंबर महिन्यापासून सकाळच्या वेळेतील नमस्कार भारत हे प्रसारणही बंद झाले आहे. या प्रसारणात देशात प्रकाशित होणाऱया प्रमुख वृत्तपत्रातील ठळक बातम्यांचे वाचन केले जात असे. काश्मीरमधील 370 कलम रद्द झाल्यानंतर येथील संपर्क सेवा बंद होती. या काळात बीबीसी रेडीओने साधारण महिनाभर येथील प्रत्येक दिवसाच्या सध्यस्थितीची माहिती मिळवून प्रसारण केले होते.
2001 मध्ये बीबीसी हिंदी डॉट कॉमची सुरवात करण्यात आली. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱयात स्थायीक झालेल्या भारतीयांना देशातील सर्वंकश माहिती मिळू लागली. तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह, इंद्रकुमार गुजराल बीबीसी हिंदी डॉट कॉमचे स्तंभकार राहिले होते. त्याशिवाय अभिनेता देवानंद, मनोज वाजपेयी, कवि निदा फाजली, साहित्यकार असगर वजाहत, फिल्मस्तंभकार कोमल नहाटा, भावना सोमय्या, क्रीडा पत्रकार प्रदिप मैगझीन वेळोवेळी या वेबसाईटशी सलग्न राहिले होते.
आज पंकज प्रियदर्शी, रेहान फजल, अचला शर्मा, मानसी दास, भुमिका राय अशा निवेदकानी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाची जादू श्रोत्यांवर पसरवून त्यांच्यावर बीबीसीचे ऋणानुबंध घट्ट केले. पण बीबीसी हिंदी रेडीओ प्रसारण बंदची तारिख जाहिर झाली आणि बीबीसीचे करोडो श्रोते भावविवष झाले. बीबीसीकडे दररोज हे रेडीओकेंद्र बंद करू नये अशा भावना व्यक्त करणाऱया पत्रांचा ओघ लागला आहे. पैशाची कमी असेल तर तेसुध्दा देण्याची तयारी श्रोत्यांनी पत्रातून दाखविले आहे. आम्ही आमच्या परिवारापासून दूर होत असल्याची खंतही श्रोते व्यक्त करीत आहेत. चंपाहरण बिहार मधील एका मंदिरात रहाणाऱया मिथलेश झा या साधुबाबानी माझ्याकडे रेडीओशिवाय बातम्या समजण्याचे दुसरे साधन नाही. संध्याकाळी साडेसातला बीबीसीच्या बातम्या ऐकूनच त्या बातमीचा खरे खोटेपणा मी ठरवित असतो असे पत्र पाठवून भावना व्यक्त केली आहे. कांही श्रोतेतर आमचा जंगली भाग आहे, वाळवंटी भाग आहे, डोंगर दऱयाचा भाग आहे, विज, इंटरनेट, स्मार्टफोन नाही. फक्त बीबीसी रेडीओ हेच जगाशी संपर्क साधण्याचे साधन आहे. त्यामुळे हे केंद्र बंद करू नका अशी आर्जव करणारी श्रोत्यांची पत्रे बीबीसीवरील श्रोत्यांचे प्रेम दर्शवित आहेत. गेली 80 वर्षे आपल्या विशिष्ट भाषाशैलीने, निष्पक्षपातीने श्रोत्यांना आपले वेगळे वैशिष्टय़ ठरलेल आणि खऱया अर्थाने श्रोत्यांच्या मनात घर करून राहिलेले बीबीसी मात्र जानेवारीतील 31 तारखेला शेवटचे प्रसारण करून आपल्या श्रोत्यांना अलविदा करणार आहे. याची रूखरूख मात्र सर्वांना अस्वस्थ करून जात आहे.









