ऑनलाईन टीम / बीड :
बीडच्या पाटोदा तालुक्यात एका विवाहित महिलेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा गणेश रायकर (वय 21) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजाला तिच्या सासरीच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. लग्न झाल्यापासून सासरी काही ना काही कारण काढून पूजाचा छळ सुरु होता. सुरुवातीला मुल होत नाही म्हणून पूजाचा छळ सुरू होता. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी कार घेण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली. पण माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिने पैसे आणले नाही. त्यामुळे तिचा छळ करण्यात येत होता.
पुढे हा त्रास वाढत गेला आणि तिला रोज मारहाण करणं, उपाशी ठेवणं, असे प्रकार सुरु झाले. रोजच्या जाचाला कंटाळून पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 19 मे रोजी तिने सॅनिटायझर प्यायले, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु, 26 तारखेला तिचा मृत्यू झाला.
पूजाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरच्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचे प्रकरण समोर येऊ नये यासाठी तिला कोरोना झाला असल्याचा खोटा अहवाल देखील तयार केला. परंतु, शवविच्छेदनात सत्य समोर आले. त्यानंतर पूजाच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








