राज्यमंत्री आदिती तटकरे यांची माहिती,
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागरमध्ये बीच सॅक उभारणीचा पहिला प्रायोगीक प्रयत्न असून यामध्ये स्थानिकांना 30 टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे, तर 70 टक्के जे चालवण्यास सक्षम आहेत त्यांना दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन व फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे गुहागर तालुक्यात बाधित झालेल्या पर्यटन, फलोत्पादन नुकसानीच्या मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी तसेच एमटीडीसी रिसॉर्ट तसेच बीचसॅक पॉलिसी अंतर्गत गुहागर समुद्रकिनाऱयाला भेट देण्यासाठी दौरा केला. यामध्ये प्रथम गुहागर समुद्रचौपाटीची पहाणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर प्रशासकीय बैठक घेऊन नुकसानभरपाई वाटपाचा आढावा घेतला.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गुहागर तालुका हा पर्यटनाला पोषक आहे. यामुळे गुहागर समुद्रकिनाऱयावर एकूण 10 बीच सॅक उभारण्यात येणार आहेत. याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली असून ते कशाप्रकारे असतील याची धेयधोरणे निश्चित होणार आहेत. स्थानिक निसर्गाला बाधा न पोहचता याची उभारणी केली जाणार आहे. हे वर्ष कोरोना प्रादुर्भावामध्ये गेले. यामुळे नव्या वर्षात याची सुरूवात करता येईल. आजच्या स्थितीत पर्यटन सुरू करणे हा शेवटचा विषय ठरला आहे. यामुळे येणारा पर्यटक हा सुरक्षित आहे याची हमी दिल्यानंतर हा विषय अधिक सक्रियपणे सुरू होईल. याचबरोबर तालुक्यात विविधठिकाणी पर्यटन क्षेत्र कसे विकसित करता येईल याबाबत पुन्हा बैठक होईल. जास्तीत जास्त वॉटरस्पोर्ट सुरू करण्याचा प्रयत्न राहील. एमटीडीसीअंतर्गत व्यवस्था अधिक वाढवून यामधून रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल. जिल्ह्यात एखादे स्मारक व म्युझियम उभे करण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आज निसर्ग चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे ते 10 ते 15 वर्षे मागे गेले आहेत. यामुळे त्यांना नुकसानभरपाई ही अपुरीच ठरणार आहे, परंतु त्यांना हातभार म्हणून नुकसानभरपाई दिली जात आहे. गेल्या चार-पाच महिन्यात राज्यशासनाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तरीही शेतकरी व बागायतदारांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जुनी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना प्राधान्य असणार आहे. तसेच सुपारी व कोकम लागवडही यामध्ये घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. गुहागर तालुक्याचे क्रीडा संकुल दुरूस्तीकरिता निधी देऊन सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पूर्वी 1 कोटी रूपये होते व ती रक्कम आता 5 कोटीवर देऊ केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेकांची निवेदने
बऱयाच कालावधीनंतर गुहागरमध्ये मंत्र्यांचा लाल दिवा दिसून आला. यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या आगमनामुळे अनेकांनी निवेदने देऊन विविध विषय मांडले. गुहागर नगरपंचायतीने गुहागर नगरपंचायत झाली असून सीआरझेड 2मध्ये समाविष्ट करण्याबरोबर सध्या सीआरझेड 3मध्ये असलेली बांधकामे शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तोडण्याचे आदेश नगरपंचायतीला दिले आहेत, परंतु आम्ही सर्व स्थानिक प्रस्थापित असून यावर शिथिलता यावी अशी मागणी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केली. भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याकडूनही तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या माध्यमातून सात ते आठ निवेदने देण्यात आली. क्रीडा संकुल, देवघर येथील एमआयडीसीसाठी घेतलेल्या जागेच्या सातबाऱयावरील नोंदी काढणे, एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या वादळग्रस्तांना नुकसानभरपाई, अवैधपणे बांधलेली जेटी, सीव्ह्यू गॅलरी आदी विषय ठेवण्यात आले.









