मणिकांत बुकीटगार मालिकावीर, आशुतोष हिरेमठ सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बीएससी डेपो टायगर्स संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व राखताना व्ही.व्ही. सुपर किंग्स संघाचा तब्बल 44 धावांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवून पी. एस. घाळी चषक पटकाविला. आशुतोष हिरेमठ याला सामनावीर तर मालिकावीर मणिकांत बुकीटगार यांना गौरविण्यात आले.

युनियन जिमखाना आयोजित एसपी घाळी चषक सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात बीएससी डेपो टायगर्स संघाने 25 षटकात 6 बाद 186 धावांचा डोंगर रचला. 14 वषीय आशुतोष हिरेमठने 13 चौकार व 1 षटकारासह 68 धावा, आकाश कुलकर्णीने 6 चौकारांसह 61, हर्ष पटेल 20 तर लाभ वेर्णेकरने 17 धावा केल्या. सुपर किंग्सतर्फे आदित्य दंगणावर, अभय कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर किंग्स संघाने 25 षटकात 9 बाद 142 धावाच केल्या. त्यात मणिकांत बुकीटगारने 28, चंद्रकांत कलबुर्गी 22, आदित्य दंगणावर 20, प्रभू कल्लोळी 18 धावा केल्या. बीएससी डेपो टायगर्सतर्फे हर्ष पटेल, आकाश कुलकर्णी व ऋतुराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रमुख पाहुणे जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, रणजीपटू वैभव गोवेकर, नागरत्ना हिरेमठ, आदिनाथ हिरेमठ यांच्या हस्ते विजेत्यां बीएससी टायगर व उपविजेत्या व्ही. व्ही. सुपरकिंग्स संघाला चषक, पदके व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सामनावीर आशुतोष हिरेमठ (बीएससी) इम्पॅक्ट खेळाडू व स्पर्धेत छाप सोडणारा खेळाडू आकाश कुलकर्णी (बीएससी), उत्कृष्ट फलंदाज कवीश मुक्कण्णावर, उत्कृष्ट गोलंदाज गौरव काटने यांना चषक व प्रमाणपत्र देवून तर मालिकावीर पुरस्कार विजेता मणिकांत बुकीटगार याला गियर सायकल देवून गौरविण्यात आले. यावेळी संघमालक राहुल रायकर, नियाज इनामदार, हुसेन गोकाक, मोहम्मद सय्यद, दयानंद हिरेमठ, विजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन परशराम पाटील, सचिन साळुंखे उपस्थित होते. मिलिंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.









