बॉण्डच्या आधारे रक्कम उभारणार : कंपनीच्या अधिकाऱयांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक संकटाचा सामना करत असलेली देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल 18 हजार कोटी रुपयांची संपत्ती विकण्याची योजना आखत आहे. यासोबतच कंपनी सॉवरेन गॅरेंटी बॉण्डच्या आधारे जवळपास 8,500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम उभारणार असल्याची माहिती आहे.
कंपनी एका वर्षात जवळपास 18,000 कोटी रुपयांच्या संपत्तीची विक्री करण्याची योजना बनवत असल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष आणि संचालक पी. के. पुरवार यांनी दिली असून कंपनीला वित्त वर्ष 2021 मध्ये नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कंपनीचा बॉण्ड सकाळी 10.30 वाजता खुला करून 12 वाजता बंद करण्यात आला. बॉण्डच्या बोलीसाठी दुप्पट प्रतिसाद लाभला आहे. बीएसएनएलकडे 17,183 कोटी रुपयांसाठी 229 बोली प्राप्त झाल्या आहेत. यातील मंजुरीसाठी जवळपास 8,500 कोटीच स्वीकारले जाणार आहेत. सदरचा बॉण्ड हा 6.79 टक्क्मयांसह वर्षाच्या पातळीवर 10 वर्षासाठी सादर करण्यात येणार आहे.
बॉण्डमध्ये सहभाग
बीएसएनएलच्या बॉण्डमध्ये आयसीआयसीआय प्रूडेंशिअल बॉण्ड, राष्ट्रीय पेंशन योजना, भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक सहभागी होणार आहेत अशी माहिती आहे.









