कणकवलीतील शेकडो दूरध्वनी पुन्हा बंद : हायवे एजन्सीच्या मनमानीपणाचा फटका
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरातील बीएसएनएलच्या केबल तुटण्याचे सत्र काही थांबण्याची चिन्हे नाहीत. महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने दिलेल्या लाईन आऊटप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आरओडब्ल्यू लाईनच्या आत बीएसएनएलकडून नव्याने केबल टाकण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गटारासाठी खोदाई करताना ही केबल तोडण्यात आल्याने कणकवली शहरातील 500 हून अधिक लॅण्डलाईन बंदस्थितीत आहे. ब्रॉडबॅण्ड सुविधाही बंद असल्याने हायवे ठेकेदार कंपनीच्या या मनमानी कारभाराचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
कणकवली शहरातून होत असलेल्या चौपदरीकरणात बीएसएनएलच्या केबल तोडण्याचे सत्र गेले वर्षभर सुरू आहे. कणकवली शहरातील अनेक दूरध्वनी बंद असल्याने याबाबत शहरवासीयांमार्फत बीएसएनएलला जाब विचारण्यात आला होता. नंतर बीएसएनएलने नव्याने केबल टाकून दूरध्वनी सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गांगो मंदिर ते नरडवे चौकापर्यंत बीएसएनएलची केबल नव्याने टाकण्यात आली. ही केबल टाकण्यापूर्वी दिलीप बिल्डकॉनचे तत्कालीन अधिकारी सतीश यादव यांनी बीएसएनएलला लाईन आऊट दिली. त्यानुसार हे काम करण्यात आले.
शहरातील गटारांची बांधकामे सुरू करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी नव्याने टाकलेली केबल तोडण्यात येत आहे. त्यामुळे बीएसएनएलचे अधिकारी पुरते हैराण झाले आहेत. गटारांच्या बांधकामासोबतच आता ठेकेदार कंपनीकडून पथदीप खांबांसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यावेळीही बीएसएनएलच्या केबल तोडण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील काही महिने पुन्हा शहराच्या काही भागातील दूरध्वनी सेवा बंद राहणार आहे. एकिकडे बीएसएनएल आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असताना हायवेच्या ठेकेदार कंपनीकडून बीएसएनएलचे अशाप्रकारे वारंवार नुकसान केले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी हे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत मंडळ अभियंता ए. एम. देवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आतापर्यंत ठेकेदार कंपनीने बीएसएनएलचे लाखाहून अधिक नुकसान केल्याचे सांगितले. शहरात हायवेचे काम करण्यापूर्वी बीएसएनएलच्या अधिकाऱयांना कामाची कल्पना द्या. त्यावेळी आमचे अधिकारी तेथे उभे राहून केबल तुटणार नाही, याची माहिती देतील, असे सांगितले होते. मात्र, ठेकेदार कंपनी अचानक काम सुरू करून केबल तुटल्यावरच आम्हाला काम करत असल्याची माहिती देत असल्याचे देवळीकर यांनी सांगितले.
कणकवली शहरातील अनेक भागातील दूरध्वनी बंद असल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, हायवेचे काम पूर्ण होईपर्यंत आता नव्याने केबल टाकणे योग्य होणार नाही. त्यामुळे या कालावधीत बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत चालण्यासाठी बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची गरज असल्याचे देवळीकर यांनी सांगितले.









