मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील जर्मन कंपनी बीएमडब्ल्यू यंदा 25 नव्या मोटारी भारतीय बाजारात सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रीत वाढीसाठी व बाजारात विस्तारासाठी कंपनीचा प्रयत्न यंदा दिसून येणार आहे. कोरोनाच्या कारणास्तव मागच्या वर्षी काही महिने कंपनीला अडचणीचे गेले आहेत. दरम्यानच्या काळात विक्रीत कमालीची सुस्ती दिसली होती. याचा फटका इतर कंपन्यांप्रमाणे बीएमडब्ल्यूलाही बसला आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक व्यवसाय थंडावले होते. अनेकांनी पर्यटनासही जाण्यास नकार दिला होता. पण आता कोरोनाचे सत्र संपत आले असून यंदा बीएमडब्ल्यू नव्या उमेदीसह आपल्या नव्या मोटारी ग्राहकांकरता सादर करणार आहे. त्यासाठीची योजना कंपनीने सविस्तर पद्धतीने आखली आहे. यामध्ये आठ नव्या मोटारी असणार असून इतर या आधीच्या मॉडेलच्या सुधारित आवृत्त्यांची मॉडेल्स असतील असे कंपनीने म्हटले आहे. लक्झरीसह सुव्ह गटामध्ये बीएमडब्ल्यूच्या मोटारी दाखल होतात, ज्यांना ग्राहकांचा प्रतिसाद हमखास लाभतो, असे कंपनी सांगते.









