ऑनलाईन टीम / पाटणा :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सामान्य माणसांबरोबरच राजकीय नेते आणि त्यांच्या परिवारात देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारी घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. पाटणा येथे सरकारी घरात राहत असलेली मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे.
सोमवारी उशिराने कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नितीश कुमार यांच्या पुतणीला पाटणा मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकारी निवासस्थानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर घरातील सर्व सदस्य खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन झाले आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी देखील केली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या कामात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसून ते लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 4 जुलै रोजी कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.









