पटना
बिहारमधील मुंगेरमध्ये पुन्हा शुक्रवारी हिंसाचार उफाळून आला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी मंगळवारी मुंगेर जिल्हय़ात दुर्गामातेच्या विसर्जनावेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराच्या विरोधात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि जोरदार गोंधळ घातला. आरोपींना अटक न झाल्याने संतप्त जमावाने मुंगेरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जोरदार तोडफोड केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनांची जाळपोळ केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने मुंगेरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हटवले. तसेच प्रकरणाची चौकशी मगधच्या विभागीय आयुक्तांकडे सोपवली आहे. या घटनेबाबत निवडणूक आयोगाने 7 दिवसांच्या आत अहवालही मागवला आहे.