ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधील दानापूरच्या पीपापूल भागात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी खच्चून भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या पिकअप व्हॅनमधून जवळपास 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते. यातील 9 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप जवळपास 10 ते 12 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांच्या शोधार्थ ‘एनडीआरएफ’कडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने गंगेत बुडालेली गाडी बाहेर काढली. तर स्थानिकांच्या मदतीने गंगा नदीत मृतदेहांचाही शोध सुरू आहे. आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांने दिली आहे.
जीपमधून प्रवास करत असलेले बहुतांश प्रवासी अकिलपूरचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. गाडीच्या टपावर बसलेल्या प्रवाशांनी मात्र वेळीच सावध होत आपले प्राण वाचवले मात्र जीपच्या आत बसलेल्या लोकांना गंगेत समाधी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.