पुढील 72 तास तुफान पावसाचा इशारा : मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा
वृत्तसंस्था / पाटणा, लखनौ
देशभर कोरोना महामारीचे संकट थैमान घालत असतानाच मान्सूनच्या सुरुवातीलाच आस्मानी संकट उभारले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून 110 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. तुफान पाऊस या परिसरात सुरु असून उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक नद्यांचे पाणी धोका पातळीवर पोहोचले असून सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील 38 जिल्हय़ांमध्ये पुढील 72 तास अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. लोकांनी सावधानता बाळगावी आणि अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये, असे राज्यसरकारने सांगितले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये वीज पडून बिहारमध्ये 83 जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूर, समस्तीपूर, मधुबनी, गोपालगंज, दरभंगा, अररिया आदी जिल्हय़ांमध्ये बळीची संख्या अधिक आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या परिवाराला नुकसान भरपाईच्या सुरुपात चार चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्येही वीजेचे तांडव दिसून आले आहे. वीज पडल्याने 24 जणांचा मृत्यू झाला असून येथेही मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार-चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.









