पाटणा
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. या मतदानामुळे 94 मतदारसंघांमधील साधारणतः 1 हजार 500 उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले. या उमेदवारांमध्ये राजदचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे. एकंदर 53.51 टक्के मतदान झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. ही टक्केवारी 2015 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 3 टक्क्यांनी कमी आहे. सकाळी 7 वाजता मतदानास प्रारंभ झाला. प्रारंभी मतदानाचा वेग कमी होता. साधारणतः 11 नंतर तो काही प्रमाणात वाढला. काही स्थानी मतदानयंत्रातील समस्यांमुळे काहीकाळ मतदान खंडित झाले होते. तथापि, त्वरित नवी यंत्रे देण्यात आली. दोन ठिकाणी हिंसाचार व दगडफेकीच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले.









