अन्य राज्यांमधून आलेले 27 हजार लोक 3200 विलगीकरण कक्षात
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांच्या टाळेबंदीचा 11 वा दिवस पार पडला आहे. टाळेबंदीचे कठोर पालन व्हावे याकरता बिहार पोलिसांनी प्रभावी पावले उचलली आहेत. 22 मार्चनंतर अन्य राज्यांमधून बिहारमध्ये दाखल झालेल्या 1.80 लाख जणांचे स्क्रीनिंग केले जात आहे. मुंबई येथून पोहोचलेल्या लोकांचे सर्वप्रथम स्क्रीनिंग होत आहे. केरळ, तामिळनाडू तसेच दिल्लीतून आलेल्या लोकांचेही स्क्रीनिंग होणार असून हे काम 6 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. तर राज्याच्या 3200 क्वारेंटाईन कक्षात 27 हजार लोकांना ठेवण्यात आले आहे.
जमातच्या लोकांचा शोध सुरू
निजामुद्दीन मरकजमधून आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. दरभंगा पोलिसांनी एका मशिदीत लपलेल्या 10 विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. विदेशींच्या वास्तव्याची माहिती न देणाऱया लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विदेशी व्यक्तींचा तपशील इमिग्रेशन विभागाला पाठविण्यात आला असून व्हिसा रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. विदेशी लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जात आहे.
रुग्णांचा आकडा 31 वर
राज्यात रुग्णसंख्या 31 झाली आहे. 8 रुग्णांवर पाटण्यात उपचार सुरू आहेत. तेथे 263 संशयित दाखल झाले असून यातील 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गयामध्ये ड्रोनची नजर
गया शहरात रुग्णांची संख्या 5 झाल्याने प्रशासनाने टाळेबंदीचे कठोर पालन चालविले आहे. कोरोनाने सर्वाधित ग्रस्त भागांमधून घरातून कुणीच बाहेर पडू नये याकरता ड्रोन कॅमेऱयाद्वारे नजर ठेवली जात आहे.
सिवानमध्ये सर्वाधिक संशयित
कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये 439 ने वाढ झाली आहे. 6681 संशयितांवर नजर ठेवण्यात आली आहे. सर्वाधिक संशयित सिवान जिल्हय़ात असून तेथे 3105 जणांवर नजर आहे. पूर्व चंपारण्य जिल्हय़ात संशयितांची संख्या वाढून 269 झाली आहे. तर गोपाळगंजमध्ये 705 संशयित आहेत.