एक्झिट पोलमध्ये ‘काँटे की टक्कर’ : महाआघाडी बहुमताच्या आकडय़ासमीप पोहोचण्याचा अंदाज
पटना / वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱया टप्प्यातील मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर अंतिम निकाल समजतील. तत्पूर्वी तीनही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी सायंकाळी विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी निकाल दर्शविणारे एक्झिट पोल अंदाज व्यक्त केले. या अंदाजानुसार सत्ताधारी आघाडी आणि विरोधक यांच्यात ‘काँटे की टक्कर’ असल्याचे दिसून येत आहे. एक्झिट पोलसाठी बहुचर्चित असलेल्या ‘चाणक्य’ने सर्वाधिक धक्कादायक अंदाज व्यक्त केले असून रालोआला 55 तर महाआघाडीला 180 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे
बिहारमधील विधानसभेच्या 243 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसरा 3 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर रोजी पार पडला. बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल 10 नोव्हेंबरला येणार असले तरी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी जाहीर केलेल्या अंदाजांनुसार बिहारमध्ये भाजप-संजद युती आणि विरोधी पक्षांच्या ‘महाआघाडी’मध्ये जोरदार चुरस असल्याचे दिसून येत आहे. या एक्झिट पोल अंदाजानुसार सत्ताधारी सरकारला धक्का बसणार असल्याचे स्पष्ट होत असले तरी मुख्यमंत्रिपदासाठी मात्र नितीशकुमार यांच्या पाठीशीच सर्वाधिक जनमत असल्याचे दिसून येत आहे.
रिपब्लिक इंडिया आणि जन की बात यांच्या एक्झिट पोलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राजदप्रणित ‘महाआघाडी’ला अधिक जागा मिळणार आहेत. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजप-संजद युतीला 37 ते 39 टक्के, तर ‘महाआघाडी’ला 40 ते 43 टक्के मते मिळणार आहेत. रालोआने लढलेल्या जागांपैकी जवळपास 25 जागांवर लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार संजदच्या उमेदवारांना धक्का देतील असा अंदाज आहे. जागांचा विचार केल्यास ‘महाआघाडी’ 138 जागा जिंकू शकते. तर, भाजप-संजद युतीला 91 ते 117 जागांचा अंदाज आहे. तसेच एलजेपीला 5 ते 8 जागा आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एबीपी न्यूज सर्वेक्षणात 104 ते 128 जागा एनडीए आघाडीच्या खात्यात जात आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वातील महाआघाडीला 108 ते 131 जागा मिळतील असा अंदाज आहे. एलजेपीला 1 ते 3 जागा आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाईम्स नाऊ-सी वोटरच्या पाहणीनुसारही सत्ताधारी रालोआ आणि महाआघाडी यांच्यात जोरदार चुरस दिसून येत आहे. या सर्वेक्षणात रालोआसाठी 116 जागा आणि महाआघाडीला 120 जागांचा अंदाज आहे. एलजेपीला 1 जागा तर इतरांना 6 जागा मिळत आहेत.
तिसऱया टप्प्यातही 55 टक्क्यांवर मतदान
तिसऱया टप्प्यात बिहारमध्ये 55.57 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने सायंकाळी सात वाजता ही आकडेवारी जाहीर केली. मात्र, या टक्केवारीतही आणखी किरकोळ वाढ होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी दुसऱया टप्प्यात 55.70 टक्के मतदान झाले आणि पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी 55.69 टक्के मतदान झाले.
लढवलेल्या जागा
रालोआ : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नितीशकुमार यांच्या संजदने 115 जागा, भाजप 110, विकसनशील इन्सान पक्ष 11 आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तान आवाम मोर्चाने 7 जागा लढवल्या आहेत.
महाआघाडी : लालूप्रसाद-तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने 144 जागा, काँग्रेस 70, भारतीय कम्युनिस्ट पार्टी 6, माकप 4 आणि सीपीआय-एमएलने 19 जागा लढवल्या आहेत.









