नितीश यांना सत्ता राखण्यास झाली मदत
बिहार विधानसभा निवडणुकीतच्या मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच संयुक्त जनता दल आणि भाजपच्या रालोआने बहुमत गाठण्यास यश मिळविले आहे. या निवडणुकीत सर्वात विशेष कामगिरी भाजपची राहिली आहे. भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकून सर्व एक्झिट पोल तसेच राजकीय विश्लेषकांचे दावे खोटे ठरविले आहेत.
बिहारमध्ये भाजपला 73 जागांवर विजय मिळाला आहे. तर या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 65 जागांसह दुसऱया स्थानावर राहिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला 49 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर महाआघाडीत सामील आणि 70 उमेदवार उभे करणाऱया काँग्रेसला 20 मतदारसंघांमध्ये विजय मिळाला आहे. काँग्रेसच्या गचाळ कामिगरीमुळेच राजदला सत्तेपासून दूर रहावे लागल्याचे मानले जात आहे.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली (भाजपने स्वतःचे आश्वासन पाळल्यास) रालोआ चौथ्यांदा बिहारच्या सत्तेवर येणे आता निश्चित आहे. याचबरोबर अखेर नितीश कुमार यांनी पराभवाची छाया कशाप्रकारे दूर केली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर केवळ रालोआचे नेतेच नव्हे तर राजकीय जाणकारही याचे एकमात्र उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असल्याचे म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पुन्हा एकदा बिहार निवडणुकीत चालल्याचे मानले जात आहे.
मोदींच्या सभांनी बदलले वातावरण
बिहार विधानसभा निवडणुकीत कोरोनाकाळात बिहारमध्ये परतलेल्या लोकांमधील बेरोजगारी आणि पूरामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल जनतेत नाराजी दिसून येत होती. याचबरोबर मुख्यमंत्री नितीश यांच्याबद्दलची सत्ताविरोधी भावनाही प्रबळ झाली होती. हीच नाराजी ओळखून लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये ‘एंट्री’ झाली आणि त्यांच्या सभांमध्ये दमदारपणे रालोआची भूमिका मांडण्यात आल्याने राजकीय वातावरणच पालटले आहे.
चिराग यांच्याकडे डोळेझाक
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील प्रचारसभांमध्ये चिराग पासवान यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवतील असे मानले जात होते, परंतु पंतप्रधानांनी स्वतःच्या 12 सभांमध्ये एकदाही चिराग यांचा उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान मोदींची हीच रणनीतीत उपयुक्त ठरली आहे. चिराग पासवान यांचा लोजप रालोआला अधिक नुकसान पोहोचवू शकलेला नाही.
महिलांचे आवाहन फलदायी
पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या अखेरच्या प्रचारसभेत महिलांना विशेष स्वरुपात मतदान करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी स्वतःच्या सर्व सभांमध्ये महिलांना केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करत राहिले. मोदींनी छठ पूजेचा उल्लेख करत बिहारच्या मातांनी पूजेची तयारी करावी, त्यांचा दिल्लीत बसलेला पुत्र त्यांच्या सर्व चिंता दूर करणार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदींची हीच आवाहने पाहून रालोआचे नेते सातत्याने विजयाचा दावा करत होते.
लालू कुटुंबाचे कारनामे मांडले राजद नेते तेजस्वी यादव यांच्या सभांमधील गर्दीची चर्चा होऊ लागल्यावर मोदींनी जोरदारपणे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या शासनकाळातील बिहारच्या स्थितीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी बिहारच्या तरुणाईला नितीश कुमार यांचे सरकार गेल्यास बिहारचे स्थिती खराब होणार असल्याचा संदेश देण्यास यशस्वी ठरले.









