राज्य सरकारकडून कारवाई : 7 अधिकारी केले निलंबित
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये कोरोना चाचण्यांमधील बनावटपणा समोर आल्यावर राज्य सरकारने 7 अधिकाऱयांना निलंबित केले आहे. या सर्व अधिकाऱयांच्या विरोधात विभागीय कारवाईही होणार आहे. तर सरकारने प्रकरणाचे गांभीर्य पाहता सर्व जिल्हय़ांमध्ये तपासाचे निर्देशही दिले आहेत.
जमुई जिल्हय़ात कोरोना चाचण्यांच्या अहवालांमध्ये नाव, वय तसेच फोन क्रमांकात व्यापक प्रमाणावर बनावटपणा दिसून आली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहता आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी याच्या चौकशीत प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोषी आढळल्यास त्याच्याविरोधातही कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे. कोविड-19 च्या चाचण्यांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱयांच्या पातळीवरच निष्काळजीपणा दिसून आला आहे. या अधिकाऱयांवरच कारवाई करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांमधील फसवणुकीप्रकरणी आरोग्य विभागाने 12 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित जिल्हय़ांमध्ये कोरोना चाचण्यांच्या आकडय़ांची तपासणी करून अहवाल सोपविण्याची जबाबदारी या पथकांवर आहे.
केंद्र सरकारने मागविला अहवाल
कोरोना चाचण्यांमधील बनावटपणा उघड झाल्यावर हा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारकडून यासंबंधी अहवाल मागविला आहे.









