कोरोना व्हायरसच्या उदेकानंतर दक्षिण कोरिया, पोलंड, हाँगकाँग आणि श्रीलंका येथील निवडणुका सुरळीत पार पडल्याचे उदाहरण समोर आहे. देशातील कोरोना संक्रमितांची रोज वाढणारी मोठी संख्या बघता निवडणूक आयोगाने अनेक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्रातील ग्रा.पं.ची मुदत संपल्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे बिहारमध्येही राष्ट्रपती राजवट येईल अशी विरोधकांना अपेक्षा होती. पण 25 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने एनडीएमधे खुशीचे वारे तर विरोधकांमध्ये नाराजी पसरली. यातच नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार असा ढोबळ अंदाज आला आहे. पण उत्तर प्रदेश व बिहारमधील निवडणुकांवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव असल्याने प्रत्यक्ष निकाल येईपर्यंत काही ठाम निष्कर्ष काढणे फारच कठीण असते. बिहार अजूनही मागासलेले राज्य असूनही विकासापेक्षा इथे भावनिक आणि जातीय मुद्यांवर मोठय़ा प्रमाणावर मतदान होते. शिवाय लालुप्रसादांचा आरजेडी, नितीशकुमारांचा जेडीयू आणि भाजप या मुख्य पक्षांचा व्होट शेअर आणि मिळणाऱया जागा यांचा ताळमेळ लागत नाही. 2010 मधे आरजेडीला 18.8… मते मिळून 22 जागा, तर 2015 मधे 18.4… मते मिळून 80 जागा, जेडीयूला 22.6… मते मिळून 115 व 2015 मधे 16.8… मते मिळून 71 जागा मिळाल्या होत्या. याच काळात भाजपला 16.5…, 91 जागा, 2015 मध्ये 24.4… मते मिळूनही केवळ 53 जागा, काँग्रेसला 2010 मधे 8.4… मते व 4 जागा तर 2015 मधे 6.7… एवढी कमी मते मिळूनही 27 जागा मिळाल्या होत्या. अशी विचित्र मानसिकता असलेल्या बिहारच्या राजकारणातील या निवडणुका यंदा 15 वर्षांची अँटीइन्कम्बन्सी असलेल्या नितीशकुमारांना परत संधी देणार की विस्कळीत झालेल्या महागठबंधनला संधी देणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
2014मध्ये बिहारमधे लोकसभेत भाजप आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या युतीला 40 पैकी 28 जागा मिळाल्या पण पुढच्याच वषी 2015 मध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद आणि काँग्रेस यांच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत भाजपला धुळ चारली. पण नंतर नितीशकुमार एनडीएत आल्याने सारेच चित्र बदलले. त्यामुळे एनडीएला गेल्या वषी लोकसभेत 2014 पेक्षाही मोठे यश मिळून 40 पैकी 39 जागा भाजप, नितीश आणि पासवान यांच्या युतीला मिळाल्या. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आणि लालूप्रसादांच्या राजदला एकही जागा मिळाली नाही. असा बिहारचा बेभरवशाचा इतिहास असला तरी कोरोनाने आलेली मंदी, लक्षावधी बिहारी श्रमिकांची ‘घरवापसी’ आणि बिहारमध्ये नवे उद्योग येण्याचे अत्यल्प प्रमाण, नितीशकुमारांच्या करिष्म्याला लागलेली उतरती कळा या साऱयांचा बिहारी मतदार कसा विचार करतात, हे 10 नोव्हेंबरला निकाल आल्यावरच कळेल. एनडीएचे घटकपक्ष असलेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे दिल्लीत आयसीयूमध्ये आहेत आणि मर्यादित पण हक्काची ताकद असणारा त्यांचा पक्ष व मुलगा चिराग पासवान याला बिहारचा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये भाजपने प्रचाराची आघाडी घेत सुरुवातच ‘सुशांतसिंहला न्याय द्या’ अशा फलकांनी भावनिक साद घालत केली आहे. सुशांतसिंहच्या ‘राजपूत’ समाजाचे बळ बिहारमध्ये केवळ चार टक्के आहे. पण याला प्रांतीय अस्मिता जोडण्यात आली आहे. बिहारमधून नशीब काढण्यासाठी गेलेल्या यशस्वी हिरोचा मुंबईत संशयित मृत्यू होतो आणि तो दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो आणि आरंभापासून बोलणाऱया कंगना राणावतने ‘क्षत्रिय की बेटी’ म्हणवून घेणे आणि बिहारमधील अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने सुशांतसिंह आणि कंगना या दोघांवरीलही अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणे, याचा राजकीय फायदा नितिशकुमारांनी हे प्रकरण तातडीने सीबीआय कडे सोपवण्याने एनडीएला नक्कीच होणार आहे.
शिवाय महागठबंधनाकडे एकही मोठा चेहरा नाही. नितीशकुमारांवर जनता नाराज असली तरी भाजप साथीला असल्याने लोकप्रियता टिकवून असलेला मोदींचा चेहरा एनडीएकडे आहे. भाजप आणि नितीशकुमारांच्या आक्रमक प्रचाराला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असलेले आणि आजाराने जर्जर झालेल्या एकाकी लालूप्रसादांनी निवडणुकीची दिल्लीत घोषणा झाल्यानंतर ‘उठो बिहारी, करो तैयारी, जनता का शासन, अब की बारी’ अशी गर्जना ट्वीटरवरून केली आहे. ती प्रत्यक्षात यायची तर लालूप्रसाद यांच्या मुलांना आपापसातील भांडणे मिटवावी लागतील. लालूंचे धाकटे चिरंजीव तेजस्वी यादव हेच सध्या राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आहेत. त्यावरूनच नितीशकुमार यांनी प्रचाराच्या पहिल्या फेरीतच लालूंना आपला पक्ष म्हणजे केवळ खानदानी मालमत्ता वाटते, असे टीकास्त्र सोडले आहे. रघुवंश प्रसादसिंह या लालूंच्या जुन्या सहकाऱयाने मृत्यूपूर्वी काही दिवसच आधी पक्ष सोडला होता, याचीही पार्श्वभूमी याला आहे. स्वतःचा प्रभाव असलेले चिराग पासवान अजूनही अडून बसले आहेत. ते असेच अडून बसले तर एनडीएला काहीशी सोपी वाटत असलेली ही निवडणूक थोडीशी चुरशीची होऊ शकते. लालूप्रसाद तुरुंगात, भाजपवर नाराज रामविलास पासवान आयसीयुमधे, काँग्रेसचे नेहमीप्रमाणे तळय़ात मळय़ात, कुशवाहा मायावतींच्या साथीने उभारत असलेली तिसरी आघाडी, अशा परिस्थितीत सत्ताधारी एनडीएच्या विरोधात सशक्त आघाडी बनविण्यात लालूप्रसाद यांना कितपत यश येते, यावर निवडणूक किती चुरशीची होईल हे अवलंबून आहे. सध्या तरी या आघाडीत राजद, काँग्रेस, डावे व इतर छोटे पक्ष आहेत. त्यांचे जागावाटप समन्वयाने झाले तर मात्र नितीश आणि भाजपला ही निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही. साऱया शह-काटशहांच्या राजकारणात बिहारच्या अर्थव्यवस्थेची झालेली पीछेहाट, स्थलांतरित मजुरांचा आक्रोश, लाजीरवाणी आरोग्ययंत्रणा हे मुद्दे बहुधा प्रचारात येणार नाहीतच. पंतप्रधानांच्या हस्ते विकासासाठी ई-उद्घाटने होत असली तरी सुशांतसिंहला न्याय द्या या भावनिक प्रश्नावरच प्रचार सध्या तरी जोरात आहे. निवडणुका जाहीर झाल्या झाल्या त्याच दिवशी सी व्होटर आणि एबीपी न्यूज वाहिनीने बिहारच्या मनात काय आहे याचा सर्व्हे जाहीर केला आहे. तो पाहता परत एकदा नितीशकुमार बाजी मारण्याची शक्मयता आहे. या सर्व्हेत म्हटले आहे की बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार बनू शकते. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली तयारी कागदावर तरी आदर्श वाटते आहे. बिहारी जनता किती मतदान करते हे पाहणे उद्बोधक ठरेल.
विलास पंढरी








