पटना / वृत्तसंस्था
बिहारमधील नितीशकुमार सरकारमधील शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी मेवालाल चौधरी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कृषी विद्यापीठात कुलगुरू असताना घोटाळा केल्याचा आरोप मेवालाल यांच्यावर झाला आहे. मात्र, आपल्यावर आरोप करणाऱयांवर 50 कोटींच्या मानहानीचा दावा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, मेवालाल यांच्या राजीनाम्यानंतर राजदने नितीशकुमार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केवळ एका मंत्र्याने राजीनामा देऊन चालणार नाही, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला आहे.
मेवालाल यांनी गुरुवारी दुपारी पावणेएक वाजता शिक्षण विभागात जाऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर अडीच तासातच त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. मंत्रिपदाचा राजीनामा देताना मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरही दिले आहे. जेव्हा एखाद्या प्रकरणात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल होते किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला तरच कोणताही खटला सिद्ध होतो. माझ्याविरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्हय़ाची नोंदही झालेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
मेवालाल चौधरी यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा निर्णय नितीशकुमार सरकारसाठी धोक्याचा मानला जात होता. विजयकुमार चौधरी आणि अशोक चौधरी यांची नावे मंत्रिमंडळात असणार हे ठरले होते. मात्र, मेवालाल चौधरी यांचे नाव येणे धक्काच होता. 2010 मध्ये बिहार कृषी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यांच्यावर भरती घोटाळय़ाचा आरोप होता. हे आरोप सध्या त्यांनी फेटाळून लावले आहेत. मात्र, पत्नीच्या हत्येशीही मेवालाल यांचा संबंध असल्याचा आरोप माजी आयपीएस अमिताभ दास यांनी केला आहे. याप्रश्नी दास यांनी डीजीपी यांना पत्र लिहिले आहे.
नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शपथ घेणाऱया मंत्र्यामध्ये सहायक प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. मेवालाल चौधरी यांचा देखील समावेश होता. त्यामुळे हा मुद्दा राजद व डाव्या पक्षांनी उचलून धरला होता. अखेर सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱयाच दिवशी गुरुवारी डॉ. मेवालाल चौधरी यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला.









