बुधगाव वार्ताहर
बिसूर ता. मिरज येथील प्रभाग पुनर्रचना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही प्रभाग रचना सदोष असून ती रद्द करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.
आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावांमध्ये नव्याने प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेतले आहेत. प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील ग्रामस्थांनी यावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. रोटेशन निहाय प्रभागाची सदस्यसंख्या बदलली आहे त्याबद्दल ग्रामस्थांच आक्षेप नाही. मात्र रोटेशन नुसार सदस्य संख्या बदलताना प्रभाग पुनर्रचना करण्याची गरज नव्हती.सदस्य संख्या बदलण्यासाठी कोणत्याही प्रभागात मतदार कमी किंवा अधिक करण्याची आवश्यकता नव्हती. आणि ही प्रभाग रचना करीत असताना देखील भौगोलिक सलगता दिसून येत नाही.प्रभाग क्रमांक एक व दोन ओढ्याच्या अलीकडे थोडा भाग आणि ओढ्याच्या पलिकडे थोडा भाग जोडण्यात आला आहे.तसेच ही प्रभाग रचना करीत असताना प्रशासनाने कोणत्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. काही लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी ही प्रभाग रचना केली गेली आहे. ही पुनर्रचना करीत असताना भौगोलिक सलगता चा निकष पाळला गेला नाही. राजकीय दबावापोटी ही प्रभाग रचना झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीही ही प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच संतोष पाटील, दीपक पाटील, झुंजार पाटील, महेश पाटील, अनिल पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.